माजी मुख्यमंत्री जगन्नाथ पहाडियांचा करोनामुळे मृत्यू; दुसर्‍या लाटेने घेतला 12 आमदार-खासदारांचा जीव

जयपूर : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व राजस्थानचे माजी मुख्यमंत्री जगन्नाथ पहाडिया यांचं करोनामुळे निधन झालं आहे. पहाडिया यांच्या निधनानंतर राजस्थानमध्ये गुरुवारी एक दिवसांचा दुखवटा जाहीर करण्यात आला आहे. पहाडिया यांच्या निधनानंतर मुख्यमंत्री अशोक गहलोत आणि माजी उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांसारख्या अनेक नेत्यांनी दु:ख व्यक्क केलं आहे.

पहाडिया यांनी मुख्यमंत्री, राज्यपाल आणि केंद्रीय मंत्री अशा अनेक पदांवर काम केलं होतं. त्यांच्या जाण्याने राजस्थानच्या राजकारणात न भरून निघणारी पोकळी निर्माण झाल्याची प्रतिक्रिया अनेकांनी दिली आहे. मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी ट्वीट करत त्यांचं दु:ख व्यक्त केलं आहे.

दरम्यान करोनाच्या पहिल्या लाटेमध्ये आणि दुसर्‍या लाटेमध्ये आपल्या देशाने सामान्य नागरिकांबरोबरच देशातील अनेक बड्या नेत्यांना गमावलं आहे. गेल्या दोन महिन्यात ही आकडेवारी अधिकच वाढली आहे.

महाराष्ट्रानेही काही दिग्गज नेत्यांना या करोनाच्या लढ्यात गमावलं आहे. 16 मे रोजी काँग्रेस खासदार राजीव सातव यांचं करोनानं निधन झालं आहे. काँग्रेस आमदार रावसाहेब अंतापूरकर यांचा देखील करोनामुळे मृत्यू झाला आहे.उत्तर प्रदेशमध्ये कोरोना काळात झालेली हानी मोठी आहे. याठिकाणी 23 एप्रिल रोजी लखनऊ पश्चिममधील आमदार सुरेश श्रीवास्तव, औरैयाचे रमेश चंद्र दिवाकर, 28 एप्रिल रोजी बरेलीच्या नवाबगंजचे आमदार केसर सिंह गंगवार, 7 मे रोजी सलोन विधानसभा मतदारसंघातील भाजप आमदार आणि माजी मंत्री दल बहादुर कोरी आणि सरकारमधील मंत्री आणि मुजफ्फरनगरच्या चरथावल याठिकाणचे आमदार विजय कश्यप यांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. तर बंगालमधील बरुईपूर पूर्व मतदारसंघात दोन वेळा आमदार म्हणून निवडून येणारे निर्मल मंडल, मध्य प्रदेशात काँग्रेस आमदार आणि माजी राज्य मंत्री ब्रिजेंद्र सिंह राठोड, राजस्थानमध्ये धरियावादचे आमदार गौतम लाल मीणा, राजसमंदचे भाजप आमदार किरण माहेश्वरी, सहाडातील काँग्रेस आमदार कैलाश त्रिवेदी आणि वल्लभनगरचे काँग्रेस आमदार गरेंद्र सिंह शक्तावत यांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे.

You May Also Like