राम मंदिराच्या नावाने फसवणूक; बोगस वेबसाईट तयार करून उकळले लाखो रुपये

नवी दिल्ली : उत्तर प्रदेशातील अयोध्यामध्येराम मंदिरासाठी श्री राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टने खरेदी केलेल्या जमिनीतील घोटाळ्यासंदर्भात एकामागून एक नवीन खुलासे करण्यात येत आहेत. याच दरम्यान आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. बनावट वेबसाईट तयार करून देणगीच्या नावाखाली लाखो रुपये उकळल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. राम जन्मभूमी ट्रस्ट अयोध्या अशा नावाने बेकायदेशीर वेबसाईट तयार करून पैसे उकळल्याप्रकरणी उत्तर प्रदेश पोलिसांनी पाच जणांना अटक केली आहे.

आरोपींनी बोगस वेबसाईटच्या माध्यमातून आणि राम मंदिराच्या नावाखाली देणगीदारांकडून लाखो रुपये उकळले. या प्रकरणी पाच जणांना अटक करण्यात आली आहे. अटक करण्यात आलेल्यांची ओळख देखील पटवण्यात आली आहे. आशिष गुप्ता (21), नवीन कुमार सिंग (26), सुमित कुमार (22), अमित झा (24) आणि सूरज गुप्ता (22) अशी आरोपींची नावे असल्याची माहिती पोलिसांनी दिली. पोलिसांनी कारवाई केल्यानंतर त्यांच्याकडून पाच मोबाईल जप्त केले. त्याचबरोबर एक लॅपटॉप आणि आधार कार्डच्या 50 प्रतीसह इतरही साहित्य ताब्यात घेतलं आहे.

राम मंदिराच्या नावाने बनावट वेबसाईट सुरू करून लोकांकडून देणगीच्या नावाखाली पैसे उकळणे सुरू असल्याची बाब निदर्शनास आली आहे. यानंतर उत्तर प्रदेश पोलिसांनी मोठी कारवाई केली. राम मंदिर उभारणीसाठी देणगी गोळा करणार्‍यांना सोमवारी अटक करण्यात आली. नोएडा सायबर पोलीस ठाणे आणि लखनौ सायबर क्राईम मुख्यालयातील पथकांनी संयुक्तपणे ही कारवाई केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी राम जन्मभूमी ट्रस्ट अयोध्या अशा नावाने वेबसाईट सुरू केली होती. ही वेबसाईट बेकायदेशीरपणे सुरू करण्यात आली होती. राम मंदिराच्या उभारणीसाठी आर्थिक स्वरुपात योगदान देऊ इच्छिणार्‍यांसाठी बँकेचा खाते क्रमांक देण्यात आलेला होता. त्याचबरोबर इतरही माहिती होती, असं पोलिसांनी म्हटलं आहे.

You May Also Like

error: Content is protected !!