अँटिजन टेस्टच्या प्रशिक्षणासह म्यूकरमायकोसिसवर मोफत उपचार; आरोग्यमंत्री टोपे

मुंबई : करोना रुग्णांचं बरं होण्याचं प्रमाण आता 93 टक्क्यांवर पोहोचलं आहे. पॉझिटिव्हीटी रेट 12 टक्क्यांवर आला असल्याची माहिती राज्याचे आरोग्यमंत्री टोपे यांनी प्रसारमाध्यमांना दिली. करोना संदर्भातील आढावा बैठकीनंतर ते बोलत होते.

राज्यात करोना संदर्भात आशा सेविकांचं योगदान महत्वाचंं आहे. त्यांना आता रॅपिड अँटिजन टेस्टचं प्रशिक्षण देऊन यात त्यांची मदत घेण्यासंदर्भातील निर्णय बैठकीत घेण्यात आल्याचं राजेश टोपे म्हणाले. याशिवाय कोरोनासोबतच आता म्यूकरमायकोसिसचा धोका वाढत असताना राज्य सरकारचं बारीक लक्ष या सर्व घडामोडींवर आहे, असं टोपेंनी सांगितलं.

करोना रुग्णांचं प्रमाण कमी होत असलं तरी त्यावर पूर्णपणे नियंत्रण मिळविण्यासाठी राज्य सरकार सर्वतोपरी प्रयत्न करत असून कोरोना चाचण्यांसंदर्भात महत्वाचा निर्णय बैठकीत घेण्यात आल्याचं टोपे यांनी सांगितलं. राज्यात उठसूट कुणाचीही कोरोना चाचणी करणं आता पूर्णपणे बंद करण्यासाठीच्या सक्त सूचना देण्यात आल्या आहेत. कोरोना बाधित व्यक्तीच्या संपर्कातील हाय रिस्क आणि कमी धोका असलेल्या व्यक्तींच्याच कोरोना चाचण्या करण्यात येणार आहेत. ठिकठिकाणी कोरोना चाचण्या केल्यानं पॉझिटिव्हीटी रेटवर परिणाम होतो, अशी माहिती राजेश टोपे यांनी यावेळी दिली.

फायर ऑडिटला देणार प्राधान्य
कोविड संदर्भातील आजच्या बैठकीत सर्वात पहिलं प्राधान्य कोविड रुग्णालयांच्या फायर ऑडिट संदर्भातील निर्णयाला देण्यात आलं असून प्रत्येक जिल्ह्याधिकार्‍याला जिल्ह्यातील कोविड रुग्णालयांचं फायर ऑडिट प्राधान्यानं पूर्ण करण्याच्या सक्त सूचना देण्यात आल्याचं राजेश टोपे यांनी सांगितलं. फायर ऑडिट संदर्भातील आवश्यक निधी देखील सरकारनं मंजूर केला आहे.

लॉकडाऊनचा निर्णय गुरुवारी
राज्यात 1 जूनपासून चार टप्प्यात अनलॉकची प्रक्रिया सुरू होणार आहे का? याबाबत विचारण्यात आलं असता राजेश टोपे यांनी यासंदर्भात राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार गुरुवारी बैठक घेऊन निर्णय घेणार आहेत.

You May Also Like