”पराभवाचीही सवय लावून घ्या, हे आता वारंवार होणार!”

नाशिक  : पश्चिम बंगालच्या निकालाच्या पार्श्वभूमीवर भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिलेल्या धमकीला राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी उत्तर दिलं आहे. छगन भुजबळ यांनी पश्चिम बंगाल निवडणूक निकालावर प्रतिक्रिया देताना ममता बॅनर्जींचं कौतुक केलं होतं. यावेळी त्यांनी ममता बॅनर्जींना झाशीच्या राणीची उपमा दिली होती. यामुळे संतापलेल्या चंद्रकांत पाटील यांनी जामीनावर सुटला आहात, अजून निर्दोष सिद्ध झालेला नाहीत. त्यामुळे फार जोरात बोलू नका, अन्यथा फार महागात पडेल अशी धमकीच भुजबळांना दिली.

दरम्यान एका वृत्तवाहिनीशी बोलताना छगन भुजबळ यांनी चंद्रकांत पाटलांच्या धमकीला उत्तर दिलं. ते म्हणाले की, “चंद्रकांत पाटील यांनी पराभवसुद्धा सहन करण्याची शक्ती ठेवली पाहिजे. त्यांच्या दुर्दैवाने यापुढे वारंवार त्यांना पराभवाचे फटके बसणार आहेत. त्यामुळे पराभव सहन करण्याची शक्ती ठेवून त्यांनी थोडं सांभाळून बोललं पाहिजे”.

‘मला महागात पडेल असा इशारा देता, सीबीआय-ईडीसारखी यंत्रणा यांच्या ताब्यात आहे का? असा सवालही त्यांनी उपस्थित केला. ममता दीदी झाशीच्या राणी सारख्या एक हाती लढल्या. ‘मैं मेरा बंगाल नही दुंगी असं ममतांनी सांगितलं, या माझ्या बोलण्यावर रागावण्यासारखं काय आहे’ असं भुजबळ म्हणाले. तसंच ‘पराभवाची देखिल सवय करून घ्यायला पाहिजे, कारण आता वारंवार हे फटके बसणार, तुम्ही किती लोकांवर रागावणार’ असा टोलाही भुजबळांनी चंद्रकांत पाटील यांना लगावला.

‘समीर भुजबळला माझ्याआधी अटक झाली होती, मत तो माझ्या जामिनासाठी यांच्याकडे कसा जाईल, असं म्हणत भुजबळांनी चंद्रकांत पाटलांवर पलटवार केला. सीबीआय, ईडी यांचा राजकीय उपयोग होतो हे माहिती होतं, पण आता न्यायदेवतापण त्यांच्या हातात आहे का?’ असा मला प्रश्न पडल्याचं भुजबळ म्हणाले. अचानक झालेल्या पराभवाने मानसिक गडबड होणं सहाजिक आहे. त्यामुळंच वड्याचं तेल वांग्यावर अशी स्थिती असल्याचं भुजबळ म्हणाले.

‘सीबीआय, आयबी यांनी इतर कामं सोडून पुनावाला यांना कोणी धमक्या दिल्या हे शोधून काढायला हवं. तसंच त्यांच्या सुरक्षेची व्यवस्था करून पुन्हा लस निर्मिती सुरू करावी. पुनावाला यांच्या तक्रारीची दखल कोणी घ्यायची हा देखिल प्रश्न असून लस उत्पादनावर याचा परिणाम होण्याची भीती भुजबळांनी बोलून दाखवली.

‘बंगाल निवडणुकीत पवारसाहेबांचा अदृश्य नाही तर स्पष्टपणे हात होता. पवार साहेबांनी मदत केली हे जगजाहीर आहे. त्यात लपवण्यासारखे किंवा लपवून केलेले काही नाही. लॉकडाऊनबाबत बोलताना सुप्रीम कोर्टानं काही सूचना केल्या आहेत, त्यानुसार निर्णय घेतली’ अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

आमच्या व्हॉटस्अ‍ॅप गृपला जॉईन होण्यासाठी ब्लू लाईनला टच करा

https://chat.whatsapp.com/C2lBmNXGceHGLS7IeE

You May Also Like