’डिजिटल इंडिया’च्या मोहिमेला दे धक्का; चलनी नोटांचा विक्रमी वापर

नवी दिल्ली : चलनी नोटांचा वापर विक्रमी स्तरावर पोहचल्याने रिझर्व्ह बँकेच्या आकडेवारीतून दिसून येत आहे. 2020-21 या आर्थिक वर्षात चलनी नोटांचा वापर सकल राष्ट्रीय उत्पन्नाच्या (जीडीपी) 14.7 टक्क्यांपर्यंत पोहचला आहे. देशाची अर्थव्यवस्था डिजिटल करण्यासाठी मोदी सरकारकडून प्रयत्न करण्यात येत आहेत. मात्र, देशात चलनी नोटांचा वापर मोठ्या प्रमाणात वाढल्याने या मोहिमेला मोठा धक्का लागला आहे.

देशात चलनी नोटांचा वापर कमी करण्याच्या हेतून 2016 मध्ये मोदी सरकारने नोटबंदी जाहीर केली. त्यानंतर डिजिटल व्यवहारांना प्रोत्साहन देण्यासाठी प्रयत्न करण्यात आले. ऑनलाईन व्यवहार, कार्डाद्वारे व्यवहार, युपीआयद्वारे व्यवहार करण्यासाठी अनेक उपाययोजना करण्यात आल्या. मात्र, आकडेवारीवरून अर्थव्यवस्थेत डिजिटल इंडियाच्या मोहिमेला धक्का बसल्याचे दिसत आहे. नोटाबंदी झाली, त्या वर्षात चलनी नोटांची वापर जीडीपीच्या तुलनेत खूप कमी होता. मात्र, त्यानंतर चलनी नोटांचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. रिझर्व्ह बँकेच्या वार्षिक अहवालातून ही माहिती मिळाली आहे. या अहवालानुसार याआधी जीडीपी आणि चलनी नोटांच्या वापराचे प्रमाण 12 टक्क्यांपर्यंत होते.

नोटाबांदीच्या वर्षात 2016-17 मध्ये चलनी नोटांचा वापर आणि जीडीपीचे प्रमाण 8.67 टक्के होते. मात्र, ही घट तात्पुरती होती. त्यानंतर देशात चलनी नोटांचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. 2019-20 या वर्षात ही टक्केवारी 12.03 टक्क्यांपर्यत पोहचली आणि आता ती 14.7 या विक्रमी स्तरावर आहे.

2020-21 या वर्षात चलनी नोटांमध्ये 17.2 टक्क्यांनी वाढ झाल्याने नोटांचा वापर वाढला आहे. नोटाबंदीपूर्वी 16.63 लाख कोटींच्या नोटा चलनात होत्या. त्यात वाढ होत 2020-21 पर्यंत ते प्रमाण 28.60 लाख कोटी झाले. तसेच 2020-21 या आर्थिक वर्षात कोरोनामुळे जीडीपीत घट झाली. त्यामुळेही हे प्रमाण वाढले. आगामी काही काळात चलनी नोटांचा वापर असाच असेल असा अंदाज तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. चलनात असणार्‍या नोटांमध्ये 500 रुपयांच्या नोटांचा सर्वाधिक वापर होत असल्याचे आकडेवारीतून दिसून आले येतंय.

You May Also Like