दिवाळीपूर्वी सोने झाले स्वस्त ; जाणून घ्या आज किती रुपयांची झाली घसरण

मुंबई : दिवाळीपूर्वी कमॉडिटी बाजारात नफावसुली दिसून आली आहे. शुक्रवारी मल्टी कमॉडिटी एक्सचेंजमध्ये सोन्याचा भाव ११५ रुपयांनी कमी झाला. सलग तिसऱ्या सत्रात वधारलेले सोने ४८ हजारांखाली घसरले. चांदीमध्ये देखील ३०० रुपयांची घसरण झाली होती.
सध्या मल्टी कमॉडिटी एक्सचेंजमध्ये १० ग्रॅम सोन्याचा भाव ४७८७४ रुपये इतका आहे. त्यात ८७ रुपयांची घट झाली आहे. तत्पूर्वी सोने ४७७६० रुपयांपर्यंत घसरले होते. एक किलो चांदीचा भाव ६४७९९ रुपये असून त्यात १३२ रुपयांची घसरण झाली आहे.
सराफा बाजारात सलग तिसऱ्या दिवशी सोने दरात घसरण कायम आहे. Goodreturns या वेबसाईटनुसार शुक्रवारी मुंबईत २२ कॅरेट सोन्याचा भाव ४७०५० रुपयांवर आणि २४ कॅरेटचा भाव ४८०५० रुपयांवर स्थिर आहे. दिल्लीत २२ कॅरेट सोन्याचा भाव ४७००० रुपये झाला. २४ कॅरेटसाठी सोन्याचा भाव ५१२७० रुपये इतका झाला. त्यात गुरुवारच्या तुलनेत ११० रुपयांची घसरण झाली. गुरुवारी सोन २२० रुपयांनी स्वस्त झाले होते.
चेन्नईत २२ कॅरेटसाठी ४५१२० रुपये तर २४ कॅरेट सोन्याचा भाव ४९२२० रुपये इतका झाला आहे. त्यात गुरुवारच्या तुलनेत १३० रुपयांची घट झाली. कोलकात्यात २२ कॅरेट सोन्याचा भाव ४७३५० रुपये असून २४ कॅरेट सोन्याचा भाव ५००५० रुपये इतका आहे.
वाढत्या महागाईपासून बचाव करण्यासाठी सोन्यात गुंतवणूक केली जाते. सणासुदीचा काळ पाहता नजीकच्या काळात सोन्यातील तेजी कायम राहील असे मत शेअर इंडियाचे उपाध्यक्ष रवी सिंग यांनी व्यक्त केले. सराफा बाजारात सोन्याचा भाव ४८०६५ रुपये होता तर चांदीचा भाव एक किलोसाठी ६४६९९ रुपये होता.
जागतिक कमॉडिटी बाजारात सोन्याचा भाव १७९७.८२ डॉलर प्रती औंस आहे.चांदीचा भाव ०.३ टक्क्यांनी घसरला असून तो २४.०२ डॉलर आहे. चालू आठवड्यात सोने ०.३ टक्क्यांनी वधारले आहे.

You May Also Like