१२ आमदारांच्या रखडलेल्या नियुक्तीवरुन राज्यपाल भगतसिंह कोश्यारींना कोर्टानं सुनावलं

मुंबई ।  विधानपरिषदेतील १२ नामनिर्देशित आमदारांच्या रखडलेल्या नियुक्तीबाबतच्या वादावरुन आज मुंबई हायकोर्टानं राज्यपालांनी आमदारांच्या नियुक्तीसाठी अवाजवी विलंब केल्याचं कोर्टानं म्हटलं आहे. “या जागा दीर्घकाळ रिकाम्या राहू शकत नाहीत. राज्यपालांच्या अधिकाऱ्यांच्याबाबतीत आम्ही काही गोष्टी विचारात घेतल्या आहेत. जर काही गोष्टी विशिष्ट कारणांसाठी होत असतील तर त्याची कारणीमिमांसा होणं गरजेचं आहे”, असं स्पष्ट मत कोर्टानं व्यक्त केलं आहे.

 

राज्यपाल कुणालाही उत्तर देण्यास बांधिल नाहीत. त्यामुळे त्यांना कोर्टही निर्देश देऊ शकत नाही, असंही कोर्टानं नमूद केलं आहे. पण परिस्थिती आणि जबाबदारीचं भान ठेवत त्यांनी याबाबत लवकरात लवकर निर्णय घ्यायला हवं, असं निरीक्षण नोंदवत कोर्टानं राज्यपाल नियुक्त सदस्यांच्या रखडलेल्या मुद्द्यावरुन दाखल करण्यात आलेली याचिका निकाली काढली आहे.

 

राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळानं विधानपरिषदेतील राज्यपाल नियुक्त सदस्यत्वासाठी १२ जणांची नावं राज्यपालांकडे मंजुरीसाठी पाठवली होती. पण त्यावर राज्यपालांनी अजूनही कोणता निर्णय घेतलेला नाही. जवळपास ९ महिन्यांपासून भगतसिंह कोश्यारी यांनी कोणताही निकाल दिलेला नाही. त्यामुळे हा वाद कोर्टात पोहोचला.

You May Also Like

error: Content is protected !!