कोविडच्या आपत्तीमुळे जिल्ह्यासाठी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी राज्य शासनाकडे नवीन रूग्णवाहिकांची मागणी

जळगाव : कोविडच्या आपत्तीमुळे जिल्ह्यासाठी पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी राज्य शासनाकडे नवीन अद्ययावत रूग्णवाहिकांची मागणी केली होती. याच्या पूर्ततेचा पहिला टप्पा पार पडला असून आज ना. गुलाबराव पाटील यांच्याहस्ते १३ रूग्णवाहिकांचे हिरवी झेंडी दाखवून लोकार्पण करण्यात आले.

याबाबत माहिती अशी की, जिल्ह्यातील अनेक ग्रामीण रुग्णालय व प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये असणार्‍या रूग्णवाहिका जुन्या झाल्यामुळे अडचणी येत होत्या. यातच कोरोनाची आपत्ती सुरू झाल्यानंतर वाढीव प्रमाणात रूग्णवाहिकांची आवश्यकता निर्माण झाली. याची दखल घेऊन तत्परतेने पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी राज्य शासनाकडे जळगाव जिल्ह्यासाठी ३५ रूग्णवाहिकांची मागणी केली होती. याला शासनाने मंजुरी दिली असून यातील पहिल्या टप्प्यात १३ रूग्णवाहिका जिल्ह्यासाठी प्राप्त झाल्या आहेत. तर उर्वरित रूग्णवाहिका लवकरच प्राप्त होणार आहेत.

या रूग्णवाहिकांचे आज जिल्हा रूग्णालयात लोकार्पण करण्यात आले. पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी हिरववी झेंडी दाखवून या रूग्णवाहिका शासकीय सेवेसाठी अर्पीत केल्या. यात १३ रूग्णवाहिका असून त्या जिल्ह्यातील विविध ग्रामीण रूग्णालयांना प्रदान करण्यात आल्या आहे. तर, एक मोठ्या वाहनातील अद्ययावत सामग्रीने सज्ज असणारी मोबाईल मेडिकल युनिट ही रूग्णवाहिका आहे. ही रूग्णवाहिका जिल्ह्यातील चोपडा, यावल, रावेर आदी तालुक्यांमधील आदिवासी बहुल भागांमध्ये नियमितपणे फिरवण्यात येणार आहे. यामुळे दुर्गम भागातील रूग्णांना देखील थेट त्यांच्या पाड्यावर अद्ययावत उपचार मिळणार आहेत.

पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी आज जिल्हा रूग्णालयात या रूग्णवाहिकांचे लोकार्पण केले. यात चालकांना चाव्या देऊन अ‍ॅब्युलन्सेसला हिरवी झेंडी दाखविण्यात आली. याप्रसंगी रूग्णवाहिका चालकांना प्रातिनिधीक स्वरूपात सत्कार करण्यात आला. याप्रसंगी ना. गुलाबराव पाटील म्हणाले की, कोविड आणि नॉन कोविड या दोन्ही प्रकारातील रूग्णांना वेळेत उपचार मिळणे अत्यावश्यक असते. यात बर्‍याच रूग्णांना अँब्युलन्सची आवश्यकता पडत असते. या पेशंटसाठी रूग्णवाहिका मिळावी यासाठी आपण पाठपुरावा केला असून आता उर्वरित अ‍ॅब्युलन्सेसही लवकरच मिळणार आहेत. जिल्ह्यात रूग्णांना तातडीने उपचार मिळण्यासाठी आपण कटीबध्द असल्याचेही ना. गुलाबराव पाटील यांनी आवर्जून नमूद केले.

You May Also Like