बाळासाहेब असते तर मित्राबरोबर युती केल्याचा आनंदच झाला असता – आदित्य ठाकरे

मुंबई । शिवसेनाप्रमुख हिंदूह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा जीवनप्रवास उलगडून दाखविणाऱ्या छायाचित्रांचे प्रदर्शन मुंबई विद्यापीठातील दीक्षान्त सभागृहात भरविण्यात आले आहे. या प्रदर्शनाला युवासेना आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी भेट दिली. यावेळी बोलताना त्यांनी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि त्यांनी जपलेल्या जुन्या नात्यांच्या आठवणी सांगितल्या.
बाळासाहेब आणि पवार साहेबांची मैत्री ही तेव्हापासून होती. वर्षानुवर्षे होती. मला असं वाटतं की आज महाविकास आघाडीचे सरकार झाले आहे. एक युती झालीय, मैत्री झालीय ती बघायला मोठे साहेब (बाळासाहेब) असायला हवे होते.
कारण, त्यांच्याबरोबर मी राहिलो. मला राजकारणात रस होता. मी त्यांच्या बरोबर दौऱ्याला जात असे. म्हणजे एक क्षण असा होता की एक निवडणूक जिंकलो होता. चौथ्या दिवशी माझी परीक्षा होती. मी आईला न सांगताच वडिलांबरोबर दौऱ्याला निघून गेलो. आईचा फोन आला, अरे तू कुठे गेला परवा तुझी परीक्षा आहे.
राजकारणात ही सगळी मंडळी अग्रेसर होती, पुढे होती. मग महाजन असतील, मुंडे साहेब असतील. त्यावेळचे राजकारण खूप वेगळे होते. राजकीय स्टेजवरून टोकाची टीका,आरोप- प्रत्यारोप व्हायचे. पण पातळी सोडून कुणी खाली गेले नाही. मैत्री विसरले नाहीत. खोट्या केसेस, गुन्हे दाखल करणे कधीच झाले नाही.
आज मोठे साहेब ( बाळासाहेब) असते तर त्यांना जास्त आनंद झाला असता. कारण त्यांच्या मित्राबरोबर (शरद पवार) युती आणि एकत्र आल्यानंतर महाराष्ट्राला एकत्र नेण्याचे काम शिवसेना करीत आहे, असे आदित्य ठाकरे यावेळी म्हणाले.
प्रमोदजी, पवार साहेब, मोठे साहेब यांचं त्यावेळेचं राजकारण वेगळं होत. राजकीय व्यासपीठावर जी काही टीका टिपण्णी व्हायची ती टोकाची व्हायची पण पातळी कधी खाली नेली नाही कधी मैत्री विसरली नाही, कधी एकमेकांवर खोटे आरोप, खोटे गुन्हे कधीच दाखल झाले नाहीत, आज हे मिसिंग आहे असे आदित्य यांनी आवर्जून नमूद केले.

 

You May Also Like