रात्रपाळीस गेलेला नवरा घरी परतला अन् भयावह अवस्थेत दिसली नवविवाहित पत्नी, मुंबईला हादरवणारी घटना

नालासोपारा । मुंबईनजीक असणाऱ्या विरार परिसरात एका नवविवाहित महिलेचा भयावह अवस्थेत मृतदेह आढळल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. रात्रपाळीला गेलेला नवरा सकाळी घरी परतला असताना, नवविवाहित पत्नी रक्ताच्या थारोळ्यात आढळली आहे. मृत महिलेच्या अंगावर कपडे नव्हते, तसेच तिच्या हाताची नस कापण्यात आली होती. एक महिन्यापूर्वी लग्न झालेल्या पत्नीचा अशा भयंकर अवस्थेत आढळलेला मृतदेह पाहून नवऱ्याच्याही पायाखालची जमीन सरकली आहे. याप्रकरणी विरार पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून घटनेचा तपास केला जात आहे.
संबंधित घटना विरारच्या कारगीलनगर परिसरातील तुळजा भवानी संकुल बिल्डिंग नंबर 6 मध्ये घडली आहे. प्रिया कांबळे असं हत्या झालेल्या 28 वर्षीय नविवाहित महिलेचं नाव आहे. याप्रकरणी मृत महिलेच्या पतीने विरार पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. कांबळे यांची हत्या झाली की त्यांनी आत्महत्या केली, याबाबत कोणतीही माहिती अद्याप समोर आली नाही. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहे.
मृत महिलेचा पती शुक्रवारी रात्री रात्रपाळीवर कामाला गेला होता. शनिवारी सकाळी कामावरून परतल्यानंतर, फिर्यादीची पत्नी निर्वस्त्र अवस्थेत रक्ताच्या थारोळ्यात आढळली. घरातील दृश्य पाहून पतीच्या पायाखालची जमीनच सरकली आहे. हा धक्कादायक प्रकार निदर्शनास येताच, मृत महिलेच्या पतीने या घटनेची माहिती विरार पोलिसांना दिली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत घटनास्थळाचा पंचनामा केला आहे.
घटनास्थळाचा पंचनामा केल्यानंतर पोलिसांनी मृत महिलेचा मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवला आहे. शवविच्छेदन रिपोर्टमधून मृतबाबत ठोस माहिती समोर येण्याची शक्यता आहे. त्यानुसार तपासाची दिशा ठरणार आहे. या घटनेचा पुढील तपास विरार पोलीस करत आहेत.

You May Also Like