मुंबई । काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले भाजपला थेट अंगावर घेत आल्याचं आपण पाहतो. नाना पटोले हे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष झाल्यापासून राज्यातील काँग्रेसही चांगलीच आक्रमक झाल्याचंही पाहायला मिळत आहे. पटोले हे भाजप आणि विरोधकांवर थेट टीका करतात. मात्र, आता पटोले यांचा एक व्हिडीओ जोरदार व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मारण्याची आणि शिव्या देण्याची भाषा करत असल्याचं पाहायला मिळत आहे. या व्हिडीओमध्ये ते कार्यकर्त्यांशी संवाद साधताना दिसून येत आहेत. मात्र, त्यावेळी त्यांनी पंतप्रधान मोदींबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचं पाहायला मिळतंय. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. दरम्यान, भाजपकडूनही पटोले यांच्या या व्हिडीओवर जोरदार हल्ला चढवण्यात आलाय.
—–व्हिडीओमध्ये पटोले नेमकं काय म्हणाले?
“मी का भांडतो? मी आता मागील 30 वर्षापासून राजकारणात आहे. लोकं पाच वर्षात आपल्या एका पिढीचा उद्धार करुन टाकतात. शाळा, कॉलेज हे करुन आपल्या एक-दोन पिढीचा उद्धार करुन टाकतात. मी एवढ्या वर्षाच्या राजकारणात एक शाळा नाही घेतली. एक ठेकेदारी नाही केली. जो आला त्याला मदत करतो. म्हणून मी मोदीला मारु शकतो, त्याला शिव्या देऊ शकतो आणि म्हणून मोदी माझ्या विरोधात प्रचाराला आला. एक प्रमाणिक नेतृत्व तुमच्या इथे आहे….”असं आक्षेपार्ह आणि वादग्रस्त वक्तव्य नाना पटोले यांनी केल्याचं या व्हिडीओमध्ये पाहायला आणि ऐकायला मिळत आहे.
—–प्रविण दरेकरांचा पटोलेवर पलटवार
मला वाटतं अशा प्रकारचा व्हिडीओ असेल आणि पटोले कार्यकर्त्यांशी बोलत असताना असं वक्तव्य केलं असेल तर ते दुर्दैवी आहे. आगामी राजकारणासाठी हे चिंताजनक आहे. खरं म्हणजे नाना पटोले काँग्रेस प्रदेशाध्यक्ष झाल्यापासून अशा प्रकारची वक्तव्ये अनेकदा त्यांनी केली आहेत. बोलू शकतो इथपर्यंत ठीक आहे. राजकारणामध्ये आपण वेगवेगळ्या नेत्यांवर टीका करतो, राजकीय टीका असतात, सरकार म्हणून टीका करतो. मात्र, अशा प्रकारचं वक्तव्य भयानक आहे. काँग्रेसला आज जरी देशभरात यश मिळालं नसलं तरी एक वैभवशाली परंपरा असलेला हा पक्ष आहे. अनेक चांगले नेते होऊन गेले आणि आजही आहेत. पण नाना पटोले यांनी प्रदेशाध्यक्षपणाचा बालिशपणा मांडून ठेवला आहे की, प्रत्येक आठवड्याला खालच्या पातळीची टीका करणं, बालिश वक्तव्ये करणं आणि आता तर पंतप्रधान मोदी हे देशाचे पंतप्रधान आहेत. आपण सरकार म्हणून, देशाचे प्रमुख म्हणून त्यांच्याकडे पाहत असतो. पण याठिकाणी प्रत्येक गोष्टी राजकारण, तिरस्काराने पाहत असू, आता तरी मारण्याची भाषा होत असेल तर हे लाजिरवाणं आहे, अशा शब्दात दरेकर यांनी नाना पटोलेंना फटकारलं आहे.