पुण्यात बेकायदा सावकारी करणाऱ्यास अटक; ३० हजारांच्या कर्जावर मागितले एक लाख रुपये व्याज

पुणे : आजारी भावाच्या औषधोपचारासाठी घेतलेल्या ३० हजार रुपयांच्या कर्जावर सावकाराने तब्बल एक लाख रुपयांचे व्याज मागत कुटुंबातील व्यक्तीला जिवे मारण्याची धमकी देणाऱ्या आरोपी भाटी याला पोलिसांनी ताब्यात घेत जेरबंद केले आहे. न्यायालयाने त्याला २७ जूनपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

याबतात मिळालेली माहिती अशी की, सतीश बन्सिलाल भाटी, वय ५४ रा. भवानी पेठ असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. फिर्यादी तरुणाने भावाच्या औषधोपचारासाठी भाटी याच्याकडून दरमहा १५ टक्के व्याजदराने ३० हजारांची रक्कम घेतली होती. कर्ज घेताना दुचाकीची कागदपत्रे आणि दोन धनादेश भाटीला दिले होते. आरोपीने साथीदारासह तरुणाच्या घरात शिरून २२ महिन्यांचे व्याज आणि मूळ अशा एक लाख २९ हजारांची मागणी केली. एवढच नाही तर रक्कम न दिल्यास कुटुंबीयांना जिवे मारण्याची धमकी देत मारहाण देखील केली.

तसेच, भाटीने तरुणाने दिलेल्या धनादेशाद्वारे १९ हजार रुपये काढूनही घेतले. याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर पुणे पोलिसांच्या युनिट एक शाखेने आरोपीला ताब्यात घेत त्याच्या दुकानासह घरामध्ये ६४ धनादेश, बँकेचे १६ पासबुक, मोबाइल असा १० हजारांचा ऐवज जप्त केले. आरोपीला न्यायालयात हजर करण्यात आले असता, त्याला पुढील तपासासाठी पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.

पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, सहआयुक्त संदीप कर्णिक, उपायुक्त श्रीनिवास घाडगे यांच्या मार्गदर्शनाखाली वरीष्ठ पोलीस निरीक्षक संदीप भोसले, उपनिरीक्षक संजय गायकवाड, सुनील कुलकर्णी, अजय जाधव, राहुल मखरे, अनिकेत बाबर, शशिकांत दरेकर, दत्ता सोनवणे, अभिनव लडकत, रुखक्साना नदाफ यांनी ही करावाई केली.

ताज्या बातम्यांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या व्हॉटस्अ‍ॅप ग्रुपला जॉईन व्हा…

https://chat.whatsapp.com/GdbPgC62cnKHS4YUh0x6LE

You May Also Like