संचारबंदीतही लासलगाव येथे अवैध मद्य विक्री सुसाट

नाशिक : जिल्ह्यात करोनाच्या संकटकाळात कडक निर्बंध लावण्यात आले असून वेळेच्या मर्यादा घालून देण्यात आल्या आहेत. केवळ अत्यावश्यक सेवा सुरू असतांना लासलगाव शहरातील अवैध मद्य विक्री सुसाट वेगाने सुरू झाली आहे. संचारबंदीत सामान्यांसाठी आणि मद्य रिचवणार्‍यांसाठी वेगवेगळी नियमावली लागू करण्यात आली आहे का ? असा प्रश्न नागरीकांकडून उपस्थित होवू लागला आहे.

करोना बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढू लागल्याने जिल्हाधिकार्‍यांनी अत्यावश्यक सेवा वगळता कडक निर्बंध लागू केले आहेत. परंतू जिल्हाधिकार्‍यांच्या निर्बंधांना लाथाडून लासलगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक दोन नव्हे तर तब्बल 6 अवैध मद्य विक्रीची ठिकाणे आजही बेमालूमपणे सुरू आहेत. अवैध मद्य विक्रीच्यामागे पोलीसांचाच वरदहस्त असल्याशिवाय असे होणे शक्य नसल्याची परिसरात चर्चा रंगू लागली आहे. श्री महावीर शाळेच्या परिसरात मद्यधुंदांची दररोज गर्दी होत असल्याने परस्परांमध्ये हाणामार्‍या होत असतात. या प्रकारामुळे परिसरातील महिला व नागरीकांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे. पिंपळगाव जवळील देवगाव, खेडले, झुंगे, खडक माळेगाव, टाकळी, विंचूर, रेल्वे स्टेशन परिसर या ठिकाणी अवैध मद्यविक्री वाढली आहे.

नाशिक ग्रामीणचे पोलीस अधिक्षक सचिन पाटील यांनी जिल्ह्यात अवैध धंद्यांच्या विरोधात धडाकेबाज मोहिम राबविली, परंतू आता ग्रामीण भागात अवैध मद्य विक्रीच्या धंद्याने डोके वर काढले आहे. पोलीस प्रशासनाने अवैध धंद्यावर अंकूश लावावा अशी मागणी नागरीकांकडून होते आहे.

नाकावर टिच्चून मद्यविक्री :
पोलीस लाईन तसेच नुरानी मस्जिदच्या मागे अवैध मद्य विक्री बिनधास्तपणे सुरू आहे. अवैध धंदे सुरू असतांना पोलीस ठाण्यातील अधिकारी कर्मचारी कारवाई का करत नाही ?असा सवाल जनतेतून उपस्थित होऊ लागला आहे. पोलीसी खाक्याची ताकद निष्प्रभ झाल्याने अवैध धंद्यांना सुगीचे दिवस आल्याचे दृश्य दिसू लागल्याने समाजात अप्रिय घटना घडू शकतात. लासलगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत पोलीसांच्या नाकावर टिच्चून मद्यविक्री होत असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे

You May Also Like