शिवप्रेमींच्या विरोधानंतर राष्ट्रपतींचा महत्वपूर्ण निर्णय; संभाजीराजेंनी केला’सॅल्युट’

कोल्हापूर । शिवप्रेमींनी रायगडावर हेलिकॉप्टर उतरवण्यास विरोध केल्यानंतर देशाचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद हे काय भूमिका घेणार याची उत्सुकता होती. राष्ट्रपतींचा रायगड दौरा रद्द होणार का असाही प्रश्न उपस्थित केला जात होता. मात्र आता रायगडावर रोपवेने जाण्याचा निर्णय राष्ट्रपतींनी घेतला आहे. शिवभक्तांनी हेलिकॉप्टरला केलेल्या विरोधामुळे त्यांनी हा निर्णय घेतला.
राष्ट्रपती कोविंद हे ७ डिसेंबर रोजी रायगडावर येणार आहेत. पूर्व नियोजनानुसार ते हेलिकॉप्टरद्वारे रायगडावर उतरणार होते. पण त्याला शिवभक्तांनी जोरदार विरोध केला. यामुळे त्यांचा दौरा वादग्रस्त ठरण्याची शक्यता निर्माण झाली होती.
—–संभाजीराजेंचा राष्ट्रपतींच्या भूमिकेला सलाम
शिवभक्तांनी केलेल्या मागणीला मान देत राष्ट्रपतींनी रायगडावर जाण्याचा मार्ग बदलला असून ते आता रोपवेने गडावर जाणार आहेत. शिवाजी महाराजांना अभिवादन करण्यासाठी कोणत्याही परिस्थितीत आपली रायगडावर येण्याची इच्छा आहे अशी राष्ट्रपतींनी भावना व्यक्त केल्याची माहिती खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी दिली. त्यांच्या या भूमिकेला आपण सॅल्युट करतो असे ही संभाजीराजेंनी म्हटले आहे.
राष्ट्रपती कोविंद यांच्या रायगड दौऱ्यासाठी रायगड व पाचाडसह ७ हेलिपॅड तयार करण्यात आले होते. रायगडावर होळीचा माळ येथे हेलिपॅड तयार करण्यास शिवप्रतिष्ठान हिंदुस्तानसंघटनेसह अनेकांनी जोरदार विरोध केला होता. प्रशासनाने या संघटनांची समजूत काढण्याचाही प्रयत्न केला. पण विरोध कायम राहिल्यामुळे राष्ट्रपतींनीच आपला मार्ग बदलला आहे.

You May Also Like