पंतप्रधानांसमोर जिल्हाधिकार्‍यांनी केलं मुख्यमंत्री ठाकरेंचं कौतुक

अहमदनगर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज घेतलेल्या जिल्हाधिकार्‍यांच्या बैठकीत मुख्यमंत्र्यांना पुतळ्यासारखे बसवून ठेवल्याची आगपाखड पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केली असली तरी महाराष्ट्राच्या बाबतीत मात्र वेगळे चित्र पाहायला मिळाले.

महाराष्ट्रातून बोलण्याची संधी मिळालेले अहमदनगरचे जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं कौतुक केलं. मुख्यमंत्री आणि मुख्य सचिवांनी घेतलेल्या विविध निर्णयांमुळे करोनाशी लढा देण्यात यश येत असल्याचं डॉ. भोसले यांनी सांगितलंय.

पंतप्रधान मोदी यांनी आज देशातील निवडक जिल्ह्याच्या जिल्हाधिकार्‍यांशी दूरदृश्यप्रणालीद्वारे थेट संवाद साधला. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांनी जिल्ह्यात राबविण्यात येत असलेल्या उपाययोजना, केंद्र आणि राज्य शासनाच्या आदेशाची यशस्वी अंमलबजावणी, माझे कुटुंब माझी जबाबदारी मोहिमेची व्यापक अंमलबजावणी यांची माहिती पंतप्रधानांना दिली. पंतप्रधानांनी यावर समाधान व्यक्त केले. मात्र, प्रत्येक उपायाची माहिती सांगताना डॉ. भोसले यांनी त्याचे श्रेय मुख्यमंत्र्यांना दिले.

या बैठकीला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे अधिकारी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आरोग्यमंत्री राजेश टोपे उपस्थित होते. नगरहून जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांच्यासह जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र क्षीरसागर, महानगरपालिका आयुक्त शंकर गोरे, निवासी उपजिल्हाधिकारी संदीप निचित, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुनील पोखरणा, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संदीप सांगळे, जिल्हा साथरोग सर्वेक्षण अधिकारी डॉ. दादासाहेब साळुंके, सर्व नोडल अधिकारी सहभागी झाले होते. या बैठकीनंतर स्वत: मुख्यमंत्री ठाकरे आणि मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनीही डॉ. भोसले यांना फोन करून त्यांचे कौतुक केले.

You May Also Like