भारत – इंग्लंड टेस्ट सीरिजवर करोनाचे सावट

टीम इंडिया लसीकरणानंतर बायोबबलमध्ये जाण्यास सज्ज
नवी दिल्ली ।  भारत – इंग्लंड यांच्यामध्ये 4 ऑगस्टपासून पाच क्रिकेट टेस्ट मॅचची मालिका खेळवली जाणार आहे. पण या मालिकेवर करोनाचे सावट आहे. इंग्लंडमध्ये पुन्हा एकदा कोविड-19च्या रुग्णांची संख्या वाढत असून, गेल्या आठवड्यात पाकिस्तानविरुद्धच्या वन-डे मालिकेपूर्वी इंग्लंडच्या क्रिकेट संघातील सात खेळाडूंनाही लागण झाल्याचं आढळलं आहे.

कर्णधार विराट कोहली याच्या नेतृत्वाखालील भारतीय क्रिकेट टीमचं लसीकरण पूर्ण करण्यात आलं असून, त्यानंतरही त्यांची कोविड-19 चाचणी घेण्यात येणार आहे. तसंच त्यांच्यासाठी बायो बबलची सुविधा सज्ज करण्यात आली आहे. वर्ल्ड कप टेस्ट अजिंक्यपद स्पर्धेसाठी इंग्लंडमध्ये गेलेला भारतीय संघ इंग्लंड बरोबरच्या टेस्ट सीरिजसाठी तिथेच तळ ठोकून आहे. आधीच्या स्पर्धेनंतर बायो बबलमध्ये असलेल्या भारतीय संघाला तीन आठवड्यांची सुट्टी देण्यात आली होती. ही सुट्टी संपल्यानंतर 7 जुलै ते 9 जुलै या कालावधीत खेळाडूंना कोविड लसीचा दुसरा डोस देण्यात आला. त्यानंतर शनिवारी खेळाडूंची आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांचीही कोविड चाचणी घेण्यात आली.

 

भारतीय टेस्ट टीममध्ये रोहित शर्मा, शुभमन गिल, मयंक अग्रवाल, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे (उपकर्णधार), हनुमा विहारी, ऋषभ पंत (विकेटकीपर), आर. अश्विन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, जसप्रीत बुमराह, ईशांत शर्मा, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, शार्दुल ठाकूर, उमेश यादव यांचा समावेश असून तंदुरुस्त असल्यास के.एल. राहुल आणि वृद्धिमान साहा यांनाही संधी मिळणार आहे. अनेक खेळाडूंचे कुटुंबीयही त्यांच्यासोबत इंग्लंडमध्ये आहेत.

You May Also Like