हे संयुक्त शेतकर्‍यांचे व्यासपीठ; अन्यथा एकेकाचं बक्कल काढणार : राकेश टिकैत

नवी दिल्ली : भाजपाचे काही कार्यकर्ते आपल्या एका नेत्याचे स्वागत करण्यासाठी गाझीपूर सीमेवर पोहोचले. ते येताच या ठिकाणी मोठा राडा सुरू झाला. यावरून शेतकरी नेते राकेश टिकैत यांनी इशारा दिला आहे. भाजपाचे नेते कार्यकर्ते इथे आले तर एकेकाचे बक्कल काढले जाईल. हे शेतकर्‍यांच्या संयुक्त मोर्चाचे व्यासपीठ आहे. यावर कोणीही कब्जा करण्याचा प्रयत्न करू नये, असं टिकैत यांनी सांगितलंय.

झेंडा लावून व्यासपीठावर कब्जा करण्याचा प्रयत्न करणार्‍यांवर उपचार केला जाईल, असा इशारा दिला आहे. व्यासपीठावर कब्जा करून कुणाच्याही स्वागताला कशी काय परवानगी दिली जाऊ शकते. हे सर्व पोलिसांच्या उपस्थित घडलं आहे. व्यासपीठावर कब्जा करून आपल्या नेत्यांचे स्वागत करून दाखवण्याचा भाजपा कार्यकर्त्यांचा प्रयत्न होता. व्यासपीठ हवे आहे तर मग आंदोलनात सहभागी का होत नाही? असा सवाल देखील टिकैत यांनी केला आहे. राकेश टिकैत यांनी रस्ता सर्वांचा आहे. पण शेतकर्‍यांच्या संयुक्त मोर्चाच्या व्यासपीठावर कोणीही कब्जा करू शकत नाही. संपूर्ण उत्तर प्रदेशात त्यांना कुठेही फिरू दिले जाणार नाही.

केंद्रीय कृषी कायद्यावर ठोस उपाय निघेल, असे आताच्या घडीला तरी वाटत नाही, असे राकेश टिकैत यांनी याआधी बोलताना नमूद केलं होतं. दरम्यान, गतवर्षीच्या 26 नोव्हेंबर रोजी शेतकरी आंदोलनाला सुरुवात झाली होती. या पार्श्वभूमीवर प्रत्येक महिन्याच्या 26 तारखेला विशेष कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. कोरोनाच्या नियमांमुळे आंदोलनस्थळी गर्दी कमी आहे. मात्र, आगामी काळात शेतकरी मोठ्या प्रमाणावर आंदोलनस्थळी जमतील. तसेच या प्रकरणी ठोस निर्णय, तोडगा निघत नाही, तोपर्यंत शेतकरी मागे हटणार नाही, याचा पुनरुच्चार राकेश टिकैत यांनी केला.

You May Also Like