जयपूर : राजस्थानात काळी बुरशी महामारी जाहीर; नियमांचे पालन न केल्यास होणार कठोर कारवाई

जयपूर : कोरोना महामारीतून सुरक्षितरीत्या बाहेर पडलेल्यांपैकी अनेक जण आता काळी बुरशीला (ब्लॅक फंगस किंवा म्युकरमायकोसिस) तोंड देत आहेत. देशात अनेक राज्यांत काळी बुरशीचे रुग्ण वेगाने वाढत आहेत. राजस्थान सरकारने राज्यात काळ्या बुरशीच्या रुग्णांची संख्या वाढत असल्याचे पाहून हा आजार महामारी जाहीर केला आहे. एकच दिवस आधी हरयाणा सरकारनेही काळी बुरशीला महामारी जाहीर केलेले आहे. हरयाणा सरकारने महामारीबाबत आवश्यक निर्देश जारी केले असून, त्यांचे पालन न झाल्यास दंडनीय कारवाई केली जाणार आहे.

राजस्थानच्या आरोग्य विभागाने जारी या अधिसूचनेनुसार कोरोना विषाणूच्या फैलावाच्या परिणामामुळे म्युकरमायकोसिसच्या (काळी बुरशी) रुग्णांची संख्या सतत वाढत असल्यामुळे कोविड-१९ व काळी बुरशीवर एकीकृत उपचार व्हावेत यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे म्हटले.

दिल्लीत १६० रुग्ण घेताहेत उपचार
दिल्ली-एनसीआरमध्ये काळी बुरशी (म्युकरमायकोसिस) हात -पाय पसरत असून, दिल्लीत आतापर्यंत त्याचे १६० रुग्ण आढळले असून, ते वेगवेगळ्या रुग्णालयांत उपचार घेत आहेत. एम्सचे संचालक डॉ. रणदीप गुलेरिया यांनी काळी बुरशी वाढण्याचे कारण अनियंत्रित मधुमेह आणि स्टेरॉइडयुक्त औषधांचे सेवन असल्याचे सांगितले.

डॉ. गुलेरिया म्हणाले की, ‘अनेक वेळा लोकांना हेच समजत नाही की, आपल्याला मुधमेह आहे. स्टेरॉइड घेतल्यानंतर मधुमेहाची पातळी ३०० ते ४०० होते. त्यामुळे थेट नुकसान होते. काळी बुरशीमुळे चेहरा प्रभावित होतो, फुप्फुसे, मेंदू आणि डोळ्यांपर्यंत तो पसरू शकतो. डोकेदुखी, नाकातून रक्त येणे, चेहरा सुजणे, ताप, खोकला, छातीत वेदना आदी लक्षणे असतात. कोरोना संक्रमणामुळे हा आजार जास्त धोकादायक बनला आहे.’

स्टेरॉइड देत असाल तर रुग्णाची देखरेख करण्याची जबाबदारी आरोग्य कर्मचाऱ्याची आहे. रुग्णाला गरजेनुसार स्टेरॉइड पाच ते दहा दिवसांपर्यंत दिले जाते. जर जास्त प्रमाणात रुग्णाला औषध दिले जात असेल तर काळी बुरशीची शक्यता खूप निर्माण होते. त्यामुळे रुग्णाची देखभाल करणे खूप गरजेचे असते, असे सांगून गुलेरिया म्हणाले, ‘रुग्णाला मध्यम आणि गंभीर लक्षणे नसतील तर स्टेरॉइड दिले जाऊ नये. रुग्णाच्या मधुमेहाची पातळीही पाहणे आवश्यक आहे.’

You May Also Like