जळगाव : बीएचआर घोटाळा : जितेंद्र कंडारेचा अटकपूर्व जामीन फेटाळला !

जळगाव भाईचंद हिराचंद रायसोनी पतसंस्था घोटाळ्यातील प्रमुख संशयित अवसायक जितेंद्र कंडारेचा अटकपूर्व जामीन अर्ज पुणे न्यायालयाने फेटाळून लावला आहे. कंडारेच्या ‘तारीख पे तारीख’ वेळ काढू धोरणावर सरकारी वकील अॅड. प्रवीण चव्हाण यांनी एप्रिल महिन्यात जोरदार आक्षेप घेत जामीन अर्जाला विरोध केला होता. दरम्यान, कंडारेचा जामीन फेटाळणे दुसरा मुख्य संशयित सुनील झंवरलाही मोठा धक्का मानला जात आहे. न्यायालयाच्या आजच्या आदेशानंतर झंवर आणि कंडारेची भागमभाग सुरूच राहणार असल्याचे स्पष्ट आहे.

भाईचंद हिराचंद रायसोनी मल्टीस्टेट सहकारी पतसंस्था शाखा घोले रोड पुणेचे व्यवसाय जितेंद्र कंडारे, प्रकाश वाणी, कुणाल शहा, सुनील झंवर, महाविर जैन, सुजित वाणी, धरम साखला, योगेश साखला, विवेक ठाकरे, माहेश्वरी व इतरांनी एकमेकांच्या संगनमताने संस्थेत मोठ्या प्रमाणात अपहार केल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. यातील माहेश्वरी, सुनील झंवर, जितेंद्र कंडारे, प्रकाश वाणी, कुणाल शहा, योगेश साखला हे फरार आहेत. यातील सुनील झंवर व अवसायक जितेंद्र कंडारे या दोघांना फरार घोषित करण्याची प्रक्रिया सुरु झाली होती. त्यानुसार दोघांच्या घरावर नोटिसा देखील डकविण्यात आल्या होत्या. परंतु मुंबई उच्च न्यायालयात सुनील झंवरने फिर्याद रद्द व्हावी, यासाठी दाखल याचिकेवर सुनवाई दरम्यान, हायकोर्टाने झंवरला दिलासा दिला होता. झंवरला दोन आठवडे अटकेपासून संरक्षण देत या दोन आठवड्याच्या आतच सुनील झंवरला सेशन कोर्टातून आपला अटकपूर्व जामीन अर्ज मंजूर करून घेण्याची सूचना हायकोर्टाने केली होती.

परंतू सुनील झंवरला मुंबई हायकोर्टात मार्च महिन्यात पुन्हा एकदा जोरदार झटका दिला होता. झंवरने अटकपूर्व जामीन मिळावा यासाठी साधारण ८ ते १० वकिलांची फौज उभी केली होती. परंतू गतवेळेस तुम्हाला १५ दिवस अटकेपासून संरक्षण दिल्यानंतरही तुम्ही सेशन कोर्टात का गेले नाही?, असा सवाल कोर्टाने विचारला. त्यानंतर झंवरने आपला अटकपूर्व जामीन अर्ज मागे घेतला होता. तर दुसरीकडे बीएचआर घोटाळ्यातील संशयित आरोपी अवसायक जितेंद्र कंडारे याने जामिनासाठी अर्ज दाखल केला होता. परंतू वेळ काढू धोरणावर आज आरोपी पक्षाला कोर्टाने चांगलेच फटकारले होते. तसेच त्यांना २८ एप्रिलला म्हणजेच आज अखेरचे म्हणणे मांडण्याची संधी कोर्टाने दिली होती. त्यानुसार कंडरेच्या वकिलांनी एप्रिल महिन्यात जामीन अर्जावरील आपला युक्तिवाद पूर्ण केला होता.

दरम्यान, पुणे आर्थिक गुन्हे शाखेने आता पुन्हा सुनील झंवर आणि जितेंद्र कंडारेच्या शोधार्थ राज्यभरात पुन्हा पोलीस पथके रवाना केली असल्याचे कळते.

दुसरीकडे संशयित आरोपी अवसायक जितेंद्र कंडारे याने जामिनासाठी अर्ज दाखल केल्यानंतर वेळ काढूपणा केला होता. त्यावर आरोपी पक्षाला कोर्टाने चांगलेच फटकारले होते. तर सरकारी वकील ऍड. प्रवीण चव्हाण यांनी देखील आरोपीपक्षाच्या ‘तारीख पे तारीख’ धोरणावर जोरदार आक्षेप घेत जोरदार युक्तिवाद करत जामीन अर्ज फेटाळण्याची मागणी केली होती. त्यानुसार आज न्या. एन.एम.गोसावी यांनी आज अटकपूर्व फेटाळून लावला आहे. त्यामुळे मुख्य संशयित जितेंद्र खंडारेसह सुनील झंवरची भागमभाग सुरूच राहणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

You May Also Like