कंगना, गोखले, गुप्ते भाजपचे पपेट! लेखक लक्ष्मण मानेंची टीका; देशाची माफी मागा अन्यथा आंदोलनाचा इशारा

पुणे । कंगना राणावत, विक्रम गोखले आणि अवधूत गुप्ते अशा व्यक्तींच्या देशविरोधी वक्तव्यांची गंभीर दखल घेऊन केंद्र सरकार देशद्रोहाचा गुन्हा दाखल करणार की त्यांच्या बोलण्याची किंमत म्हणून आणखी मोठे सन्मान बहाल केले जाणार ? सरकार गुन्हे दाखल करणार नसेल तर भाजप सरकारनेच पेरलेले हे पपेट आहेत असे समजण्यास हरकत नाही अशी जळजळीत टीका सामाजिक कार्यकर्ते आणि लेखक लक्ष्मण माने यांनी आज केली. सामान्य लोकांनी अशी वक्तव्ये केली असती तर आतापर्यंत देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून तुरुंगात डांबले गेले असते याकडेही माने यांनी लक्ष वेधले.
देशाला २०१४ मध्ये स्वातंत्र्य मिळाले, असे म्हणणे हा राज्यघटना नाकारण्याचा प्रकार आहे. रानडे, गोखले, टिळक, गांधी, सावरकर, बोस, भगतसिंग अशा अनेकांनी देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले. सत्तेतील विचारधारेची मंडळी तेव्हा इंग्रजाच्या बाजूने उभी होती. देशाला मिळालेले स्वातंत्र्य या मंडळींना मान्य नाही. या लोकांसाठी नागपूरला संहिता तयार केली जाते. कंगना, गोखले, गुप्ते यांना राज्यघटनेमुळे बोलण्याचे स्वातंत्र्य मिळाले आहे ते घटनेचा रोज अपमान करत आहेत अशी टीका माने यांनी केली.
स्वातंत्र्य, देशाचे सार्वभौमत्व आणि लोकशाही यासाठी बलिदान दिलेल्या क्रांतिकारकांचा कंगना, गोखले आणि गुप्ते यांनी अवमान केल्याबद्दल त्यांच्याविरोधात देशद्रोहाची तक्रार दाखल करण्यात येणार आहे. गोखले आणि गुप्ते यांनी आठवडाभरात देशाची माफी न मागितल्यास त्यांच्या घरासमोर सनदशीर मार्गाने आंदोलन करण्यात येईल. त्यांना घराबाहेर पडू दिले जाणार नाही असा इशाराही लक्ष्मण माने यांनी दिला.

You May Also Like