कर्नाटकचे मुख्यमंत्री येडियुरप्पा यांना दुसऱ्यांदा करोनाची लागण

कर्नाटक :  कर्नाटकचे मुख्यमंत्री बीएस येडियुरप्पा यांना करोनाची लागण झाली आहे. हलका ताप आल्याने त्यांनी करोना चाचणी केली होती. त्यात त्यांना करोना झाल्याचं समोर आलं आहे. डॉक्टरच्या सल्ल्यानुसार त्यांना बंगळुरुच्या रमैया मेमोरिअल रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

७८ वर्षीय बीएस येडियुरप्पा यांना गेल्या वर्षीही करोनाची लागण झाली होती. ऑगस्ट महिन्यात त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यांच्या मुलीलाही करोना झाल्यानं रुग्णालयात भरती केलं होतं. योग्य उपचाराअंती दोघांनी करोनावर मात केली आणि त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आलं होतं.

दरम्यान, ‘मला हलका ताप होता. त्यामुळे मी करोना चाचणी करण्याचा निर्णय घेतला त्यात मला करोना झाल्याचं निष्पन्न झालं आहे. माझी तब्येत ठीक आहे. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार मला रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. माझी विनंती आहे की, जे कुणी मागच्या दिवसात माझ्या संपर्कात आले आहेत. त्यांनी काळजी घ्यावी आणि वैयक्तिक क्वारंटाइन व्हावं’ असं विनंती करणारं ट्वीट येडियुरप्पा यांनी केलं आहे.

 

 

You May Also Like