मोबाईल वापरला म्हणून किम जोंगनं दिली 10 जणांना मृत्युदंडाची शिक्षा

नवी दिल्ली : उत्तर कोरियाचा हुकुमशहा किम जोंग उनने उत्तर कोरियातील 10 जणांना मृत्युदंडाची घोषणा केलीय. या दहाजणांचा गुन्हा हा की त्यांनी मोबाईलवरून चिनी नेटवर्कचा वापर करत देशाबाहेर फोन केला. उत्तर कोरियातील नागरिकांना मोबाईलवर चिनी नेटवर्कचा वापर करायला सक्त मनाई करण्यात आली आहे. एवढंच नव्हे, तर उत्तर कोरियाच्या बाहेर कुणीही, कुठल्याही कारणासाठी फोन करणं हा देशद्रोहाचा अपराध ठरवण्यात आला आहे.

उत्तर कोरियातील किम जोंग उनच्या पक्षानं आतापर्यंत मोबाईलवरून परदेशात फोन केल्याच्या गुन्ह्याखाली आतापर्यंत 150 जणांना अटक केलीय. मार्च महिन्यात याबाबत एक गुप्त शोधमोहिमच उत्तर कोरियाच्या पोलिसांनी राबवली आणि त्यात त्यांना 150 नागरिक दोषी आढळले होते. अजूनही देशाबाहेर फोन करणार्‍या गुन्हेगार नागरिकांचा शोध पोलीस घेत असून वेगवेगळ्या भागात छापेमारीचं सत्र सुरूच असल्याची माहिती मिळत आहे.

उत्तर कोरियात राहणार्‍या अनेक नागरिकांचे नातेवाईक हे दक्षिण कोरियात राहतात. त्यांच्याशी संपर्क साधण्यासाठी नागरिक छुप्या मार्गाने मोबाईलचा वापर करतात. मात्र उत्तर कोरियातील नेटवर्कचा वापर करून आंतरराष्ट्रीय कॉल करता येत नाहीत. त्यासाठी चिनी नेटवर्कचा वापर करून अनेक नागरिक नातेवाईकांशी संपर्क साधतात. मात्र यामुळे देशाबाबतच्या अनेक बाबी चीनसह इतर देशांना कळू शकतात, अशी भीती किम जोंग उन यांना वाटते. चिनी नेटवर्कचा वापर केला, तर इथले फोन टॅप करणं आणि काही गोपनिय माहिती बाहेर जाण्याची शक्यता असल्यामुळे कुणीही त्याचा वापर करू नये, असे आदेश उत्तर कोरियाच्या सरकारने दिले आहेत. 2004 ते 2008 या चार वर्षात तर मोबाईल बाळगणे हादेखील उत्तर कोरियात गुन्हा होता. मात्र त्यानंतर देशांतर्गत वापरासाठी काही अटींवर मोबाईलला परवानगी देण्यात आली.

You May Also Like

error: Content is protected !!