२९ एप्रिलपासून गोव्यात लॉकडाऊन !

पणजी :  महाराष्ट्राच्या शेजारी असलेले राज्य आणि पर्यटकांचे आकर्षण स्थळ असलेल्या गोव्यामध्ये देखील करोनाबाधितांच्या संख्येत वाढ होऊ लागल्यामुळे अखेर गोवा सरकारने राज्यात लॉकडाऊन लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. ही माहिती राज्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी दिली असून गोव्यात येत्या २९ एप्रिल रोजी संध्याकाळी ७ वाजेपासून ३ मे रोजी सकाळपर्यंत हा लॉकडाऊन लागू असेल.

दरम्यान, गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी पणजीमध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेत लॉकडाऊन लागू करण्यात आला असला, तरी लोकांनी घाबरून न जाण्याचे आवाहन केले आहे. लोकांनी घाबरण्याचे कारण नाही. सर्व किराणा आणि अत्यावश्यक सेवा सुरू राहणार आहेत. स्थलांतरीत मजूरांना देखील माझे आवाहन आहे की त्यांनी राज्य सोडून जाऊ नये, असे सांगितले आहे. जर पुढचे काही दिवस लोक घराबाहेर पडले नाहीत, तर आपण कोरोनाची साखळी तोडण्याच यशस्वी ठरू, असे देखील ते म्हणाले. गेल्या काही दिवसांपासून वाढत असलेल्या कोरोनाबाधितांच्या संख्येच्या पार्श्वभूमीवर गोवा लॉकडाऊनचा निर्णय घेण्यात आला आहे.

यामध्ये अत्यावश्यक सेवा आणि औद्योगिक व्यवहारांना परवानगी देण्यात आली आहे. पण, सार्वजनिक वाहतूक पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहे. गोव्यातील कसिनो, हॉटेल, पब हे देखील लॉकडाऊन दरम्यान बंदच ठेवण्यात येणार आहेत. त्याचबरोबर गोव्याच्या सीमारेषा अत्यावश्यक सेवांसाठीच सुरू ठेवल्या जातील, असे देखील गोवा सरकारकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

तसेच, कसिनो, बारला गोव्यात येणाऱ्या पर्यटकांची पसंती असते. पण गोव्यातील सर्व कसिनो आणि बार लॉकडाऊनदरम्यान बंद राहणार आहेत. शिवाय, फक्त होम डिलीव्हरीसाठी रेस्टॉरंटचे किचन सुरू ठेवण्याची परवानगी देण्यात आली आहे. रेस्टॉरंट आणि हॉटेल्समध्ये जेवण्यास बंदी असेल. राज्यात कुठेही अत्यावश्यक सेवांच्या व्यवहारांसाठी किंवा कामांसाठी बंदी नसेल.

दरम्यान, आत्ता गोव्यात असलेल्या पर्यटकांना हॉटेलबाहेर पडण्यापासून मनाई करण्यात आली आहे. लॉकडाऊनच्या काळात म्हणजेच २९ एप्रिल रोजी संध्याकाळी ७ वाजेपासून सोमवार ३ मे रोजी सकाळपर्यंत पर्यटकांना आपापल्या वास्तव्याच्या ठिकाणीच राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. त्याचबरोबर गोव्यातील अनेक ठिकाणी कंटेनमेंट झोन जाहीर होण्याची देखील शक्यता आहे. याआधीच कलंगुट आणि कँडोलिम या परिसरातल्या काही भागात कंटेनमेंट झोन करण्यात आले आहेत.

दरम्यान, सध्या गोव्यात ऑक्सिजनचा कोणताही तुटवडा नसून जितकी गरज आहे, तेवढा ऑक्सिजन पुरवला जात असल्याचे देखील मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी स्पष्ट केले आहे. ज्यांच्यात कोरोनाची लक्षणे दिसत आहेत, त्यांनी चाचणीच्या रिपोर्टची प्रतीक्षा न करता तातडीने उपचारांना सुरुवात करावी, असे आवाहन देखील मुख्यमंत्री सावंत यांनी केले आहे.

आमच्या व्हॉटस्अ‍ॅप गृपला जॉईन होण्यासाठी ब्लू लाईनला टच करा

https://chat.whatsapp.com/C2lBmNXGceHGLS7IeE

You May Also Like