पुण्यात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर लॉकडाऊनचे नियम शिथिल करण्यात आले आहेत

पुणे : पुण्यात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर लॉकडाऊनचे नियम शिथिल करण्यात आले आहेत. मात्र, यामध्ये मॉल उघडण्यास परवानगी देण्यात आली नव्हती. मात्र, आता पुण्यातील मॉल सोमवार (दि.14) पासून उघडण्यास परवानगी देण्यात आली आहे. कोरोनाचा आढावा घेण्यासाठी पालकमंत्री अजित पवार यांनी आढावा बैठक घेतली. या बैठकीत झालेल्या निर्णयाची माहिती देताना अजित पवार यांनी ही घोषणा केली आहे. त्यामुळे पुणेकरांना मोठा दिसाला मिळाला आहे.

अजित पवार यांनी पुढे सांगितले की, पुण्यात सोमवार पासून मॉल उघडण्याची परवानगी देण्यात आली आहे. पुण्यातील दुकाने रात्री 7 पर्यंत उघडण्यास परवानगी देण्यात आली आहे. रेस्टॉरंट आणि हॉटेल 10 वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी राहणार आहे. तसेच अभ्यासिका, वाचनालय सुरु करण्यास सोमवारपासून परवानगी देण्यात आल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावेळी दिली.

देहु आणि आळंदी पालखी प्रस्थान सोहळ्यासाठी 100 लोकांना परवानगी देण्यात आली आहे. तसेच 10 मानाच्या पालख्यांसाठी 50 जणांना सहभागी होता येणार आहे. त्यांना मान्यता देण्याचा प्रस्ताव दिला आहे. पालखीसोबत त्यांना चालत जाता येणार नाही. प्रत्येक पालखीला 2 बसेस असे 10 पालख्यांना 20 बसेस दिल्या जातील. अजित पवार पुढे म्हणाले, मानाच्या पालखी सोहळ्याचं आगमन हे दशमीला पंढरपूरात होईल. वाखरीत विशेष वाहनाने पोहोचल्यानंतर तिथून पंढरपूरपर्यंत पायी वारी करण्यास परवानगी देण्यात आली आहे. मंदीर दर्शन खुले करण्यात येणार नाही, असेही अजित पवार यांनी सांगितले.

You May Also Like