”महाराष्ट्राने लसीकरणात ओलांडला दीड कोटींचा टप्पा”

मुंबई : करोनाच्या  पार्श्वभूमीवर  काल राज्याने पाच लाखांहून अधिक नागरिकांचे लसीकरण करत विक्रमाची नोंद केली होती. तर, आजच्या लसीकरणामुळे आता महाराष्ट्राने लसीकरणात दीड कोटींचा टप्पा देखील ओलांडला आहे. राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी या पार्श्वभूमीवर ट्विट करून माहिती दिली आहे. एवढ्या मोठ्यासंख्येने लसीकरण करणारे महाराष्ट्र हे देशातील एकमेव राज्य ठरले आहे, असं टोपेंनी सांगितलं आहे.

दरम्यान, “महाराष्ट्राने आज दीड कोटी लसीकरण पूर्ण केले असून, एवढ्या मोठ्यासंख्येने लसीकरण करणारे महाराष्ट्र हे देशातील एकमेव राज्य ठरले आहे. काल दिवसभरात ५ लाख ३४ हजार नागरिकांना लस देऊन राज्याने विक्रमी नोंद केली आहे.” असं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी ट्विट केलं आहे.

या अगोदर ३ एप्रिल रोजी ४ लाख ६२ हजार ७३५ नागरिकांचे लसीकरण करून महाराष्ट्राने राष्ट्रीय विक्रम नोंदविला होता. त्यानंतर काल राज्याने लसीकरणात पाच लाखांचा टप्पा ओलांडल्याबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी यंत्रणेनेचे अभिनंदन केले.

दरम्यान, लसीकरणात महाराष्ट्र देशात सातत्याने अग्रस्थानी आहे. आतापर्यंत १ कोटी ४३ लाख ४२ हजार ७१६ नागरिकांचे लसीकरण झाले असून त्यात आजची संख्या मिळविली तर सुमारे १ कोटी ४८ लाखांच्या आसपास ही संख्या होत असून उद्याच्या लसीकरणांनंतर महाराष्ट्र दीड कोटी नागरिकांच्या लसीकरणाचा टप्पा ओलांडेल, असे आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी काल सांगितले होते.

आमच्या व्हॉटस्अ‍ॅप गृपला जॉईन होण्यासाठी ब्लू लाईनला टच करा

https://chat.whatsapp.com/C2lBmNXGceHGLS7IeE

You May Also Like