पुरूष हॉकी संघाचे मनप्रीत सिंगकडे भारतीय संघाचे नेतृत्व

बचावपटू वीरेंद्र लाकडा आणि हरमनप्रीत सिंग यांना उपकर्णधारपद
नवी दिल्ली : टोकियो ऑलिम्पिकसाठी मिडफिल्डर मनप्रीत सिंगला भारतीय पुरुष हॉकी संघाचे कर्णधारपद सोपवण्यात आले आहे. मनप्रीत 16 सदस्यीय संघाचे नेतृत्व करेल. अनुभवी बचावपटू वीरेंद्र लाकडा आणि हरमनप्रीत सिंग यांना उपकर्णधारपद देण्यात आले आहे. मनप्रीतची ही तिसरी ऑलिम्पिक स्पर्धा असेल. त्याच्या नेतृत्वात भारतीय संघाने 2017ची आशिया कप स्पर्धा, 2018मधील आशिया चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धा आणि 2019ची एफआयएच मालिका जिंकली होती. त्याच्या नेतृत्वात संघाने 2018च्या पुरुष विश्वचषकातील उपांत्यपूर्व फेरी गाठली होती.

वीरेंद्र लाकडा हा संघाचा अनुभवी बचावपटू आहे. 2012च्या लंडन ऑलिम्पिकचा तो एक भाग होता. गुडघ्याच्या शस्त्रक्रियेमुळे 2016च्या रिओ ऑलिम्पिकमध्ये तो भाग घेऊ शकला नव्हता. 2015मध्ये संघात पदार्पण केल्यापासून हरमनप्रीतने त्याच्या कारकीर्दीत ड्रॅग-फ्लिकर आणि बचावपटू म्हणून स्वत: ला विकसित केले आहे. 2019मध्ये, मनप्रीतच्या अनुपस्थितीत हरमनप्रीतच्या नेतृत्वात टोकियो येथे ऑलिम्पिक टेस्ट स्पर्धेत भारतीय संघाने बाजी मारली होती.

मुख्य प्रशिक्षक ग्रॅहॅम रीड म्हणाले की, हे तीनही खेळाडू गेल्या अनेक वर्षांपासून संघाच्या नेतृत्वाचा अविभाज्य घटक राहिले आहेत. त्यांनी युवा खेळाडूंना आव्हानात्मक काळात मार्गदर्शन केले आहे आणि संघाचे नेतृत्व करताना परिपक्वता दर्शवली आहे.

You May Also Like