मराठा क्रांती मोर्चा! बीडमध्ये 5 जूनला पहिला मोर्चा: विनायक मेटे

बीड : मराठा आरक्षण संदर्भात 5 जूनला पहिला मोर्चा बीडमध्ये निघणार, अशी ठाम भूमिका मराठा नेते आणि आमदार विनायक मेटे यांनी घेतली असून या अनुषंगाने बीडमध्ये मोर्चाच्या पूर्वतयारीची बैठक पार पडली. सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षण रद्द झाल्यानंतर बीडमध्ये मराठा समाजाचा आक्रोश दाखवण्यासाठी 5 जून रोजी पहिला मोर्चा होत आहे. या मोर्चाची तयारी युद्धपातळीवर सुरू असून पाच तारखेला मोर्चा होणारच, असा ठाम विश्वास मेटे यांनी पत्रकार परिषदेत बोलून दाखवला.

बीड येथील शासकीय विश्राम गृह येथे मराठा क्रांती मोर्चा व मराठा नेते आमदार विनायक मेटे यांनी पत्रकार परिषद घेतली. मेटे म्हणाले की, दि.5 जूनला सकाळी 10:30 वाजता मोर्चा बीड शहरातील छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुल ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत निघणार असून या मोर्चाला परवानगी मिळो अथवा नाही पण मोर्चा होणारच असा निर्णय बैठकीत घेण्यात आलांय. या वेळी या मोर्चाचे नाव मराठा क्रांती संघर्ष मोर्चा, लढा आरक्षणाचा असे असणार आहे. करोनाचे सर्व नियम पाळून हा मोर्चा निघणार आहे.
मोर्चा यशस्वी करण्यासाठी विविध समित्यांची स्थापना करण्यात आली आहे. जनजागृतीसाठी तीन टप्पे, बीड शहर- तालुका आणि जिल्हा पातळीवर काम सुरू आहे. जिल्ह्यात प्रचार दौरा वैद्यकीय सेवेसह आजपासून सुरू झाला आहे. यासाठी 9 समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत. यावेळी मूक मोर्चा नसणार तर संघर्षशील मोर्चा असणार आहे. आमचा आक्रोश मांडणारा मोर्चा, न्याय मागणारा मोर्चा आहे. सर्व पक्षीय, संघटना, या पलीकडे जाऊन मोर्चा निघेल, असे विनायक मेटे यांनी सांगितलंय.

You May Also Like

error: Content is protected !!