कदाचित त्यांची सुपारी फुटली नसेल, मनसे आमदार राजू पाटलांचा संजय राऊतांना टोला

डोंबिवली । मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा नियोजित अयोध्या दौरा स्थगित करण्यात आला आहे. हा दौरा का स्थगित करण्यात आला, याचं कारणही राज ठाकरे रविवारी होणाऱ्या पुण्यातील सभेत सांगणार आहेत. राज ठाकरेंचा दौरा स्थगित केल्यावरून राजकारण तापले आहे. सर्व पक्षीय नेत्यांच्या प्रतिक्रिया येत आहेत. दरम्यान, शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी आज सकाळी प्रतिक्रिया देत मनसेला टोला लगावला आहे. आता राऊत यांच्या टीकेला मनसे आमदार राजू पाटील यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.
राज ठाकरेंना पाच जूनसाठी काही सहकार्य हवं असतं, तर आम्ही केलं असतं. अयोध्या दौरा का स्थगित केला? असा टोला शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी मनसेला लगावला होता. यावर मनसेचे आमदार राजू पाटील यांनी राऊत यांना जशास तसं उत्तर दिलं आहे. पहिली गोष्ट म्हणजे दौरा रद्द झाला नाही आहे, तो पुढे ढकलण्यात आला आहे आणि आम्हाला यांची गरज नाही. त्यांना कदाचित दुःख वाटलं असेल, कदाचित त्यांची सुपारी फुटली नसेल. त्यांचं राजकीय हित साध्य झालं नसेल. आणि पुन्हा एकदा यांना सुपारी द्यावी लागेल. त्याचे दुःख वाटले असेल. राज साहेबांच्या तब्येतीच्या कारणास्तव हा दौरा स्थगित केला आहे. या दौऱ्याबाबत साहेब आपली भूमिका परवा स्पष्ट करणार आहेत, असं सांगत आमदार राजू पाटील यांनी खासदार संजय राऊत यांना टोला लगावला.
—–‘म्हणून ते एकटे जाऊ शकतात…’
काँग्रेसचे नेते अतुल लोंढे यांनी आम्ही अयोध्येला दर्शनासाठी जाणार आहोत, दौऱ्यासाठी नाही, असं विधान यांनी केलं होतं. यावरही मनसे आमदार राजू पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांच्या नावातच लोंढे आहे. त्यांना लोंढे घेऊन जायची गरज नाही. म्हणून ते एकटे जाऊ शकतात. त्यांनी कसं जायचं, कसं नाही जायचं त्यांचा विषय आहे, असं आमदार राजू पाटील म्हणाले.

You May Also Like