केरळ किनारपट्टीवर 3 दिवसांत मान्सूनचे आगमन

मान्सून केरळच्या किनार्‍यापासून 200 किमीवर
नवी दिल्ली : केरळमध्ये साधारणपणे 1 जूनला मान्सूनचे आगमन होते. पण तो 31 मे रोजीच येऊ शकतो, असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला. तथापि, तीन-चार दिवस मागे-पुढे होऊ शकतात, अशी शक्यताही विभागाने व्यक्त केली. ‘स्कायमेट’ या खासगी हवामान संस्थेनेही दोन-तीन दिवसांच्या फरकासह 30 मे रोजी मान्सून केरळमध्ये दाखल होईल, असा अंदाज वर्तवला आहे. पुढील तीन-चार दिवसांत मान्सूनचे केरळच्या किनारपट्टीवर आगमन होऊ शकते, असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.

मान्सूनची गती सध्या सामान्य
आतापर्यंत मान्सूनची गती सामान्य आहे. अंदमान-निकोबार द्वीप समूहात 21 मे रोजी आगमन झाल्यानंतर तो सतत उत्तर-पश्चिम दिशेने आगेकूच करत आहे. तो सध्या श्रीलंकेच्या उत्तर भागापर्यंत पोहोचला असून गुरुवारी त्याने मालदीवही ओलांडले आहे.

मान्सून सध्या केरळच्या किनार्‍यापासून सुमारे 200 किमी अंतरावर आहे. तौक्ते चक्रीवादळादरम्यान आणि त्यानंतर केरळमध्ये जोरदार पाऊस झाला होता. गुरुवारपासून पावसाचे प्रमाण कमी झाले आहे. या चक्रीवादळाने मान्सूनचा वेग वाढवला होता. बंगालच्या उपसागरात आलेल्या ‘यास’ चक्रीवादळामुळे मान्सूनचे लवकर म्हणजे 27 ते 29 मेपर्यंत आगमन होईल, अशी शक्यता व्यक्त केली जात होती.

You May Also Like

error: Content is protected !!