‘या’ ट्वीटमुळे खासदार अमोल कोल्हे वादात

पुणे । राष्ट्रवादी काँग्रेसचे शिरूरचे खासदार व छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेते डॉ. अमोल कोल्हे एका ट्वीटमुळे वादात सापडले आहेत. पुणे विमानतळावर दर्शनी भागांत लावण्यात आलेल्या पेशव्यांच्या पेंटिग्जवरून कोल्हे यांनी नुकते च एक ट्वीट केले आहे. त्या ट्वीटमुले नेटकऱ्यांनी कोल्हे यांच्यावरच प्रश्नांचा भडिमार केला आहे.
अमोल कोल्हे यांनी पुणे विमानतळावर घेतलेला एक सेल्फी ट्विट केला आहे. त्या सेल्फीमध्ये एका भिंतीवर पेशवेकालीन चित्रे दिसत आहेत. त्याचाच संदर्भ देत कोल्हे यांनी एक ट्वीट केले आहे. त्या माध्यमातून कोल्हे यांनी पुणे विमानतळ प्राधिकरणाला लक्ष्य केले आहे. ‘पेशव्यांच्या पराक्रमाविषयी आदर आहेच, परंतु पुण्यात केवळ शनिवारवाडा नाही तर छत्रपती शिवाजी महाराजांनी केलेल्या सर्जिकल स्ट्राईकचा लालमहाल सुद्धा आहे, सिंहगडही आहे आणि याच जिल्ह्यात छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्मस्थळ किल्ले शिवनेरी हे देखील आहे. तसेच, छत्रपती संभाजी महाराजांचे बलिदानस्थळ वढू तुळापूर देखील आहे याचा पुणे एअरपोर्ट ऑथॉरिटीला विसर पडला की काय?,’ असा सवाल कोल्हे यांनी केला आहे. कोल्हे यांनी आपल्या ट्वीटमध्ये केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे, पुण्याचे खासदार गिरीश बापट, खासदार सुप्रिया सुळे व केंद्रीय हवाई उड्डाण मंत्रालयाला टॅग केले आहे.
कोल्हे यांच्या या ट्वीटवर नेटकऱ्यांच्या अनेक प्रतिक्रिया आल्या आहेत. नेटकऱ्यांनी कोल्हे यांनाच अनेक प्रतिप्रश्न केले आहेत. लोकांच्या आयुष्याशी निगडीत मुद्द्यांवर बोला. भावनिक मते मांडू नका असा सल्ला काहींनी त्यांना दिला आहे. तर काहींनी कोल्हे यांना स्वत:च्या मतदारसंघाकडे लक्ष देण्याचा खोचक सल्ला दिला आहे. तेथील रस्त्यांच्या अवस्थेची काळजी घ्या असे सुनावले आहे. ‘फोटोंपेक्षा महाराजांचे किल्ले सांभाळण्याची जबाबदारी घ्या. आपण स्वत: खासदार आहात, बोलण्याऐवजी कृती करा, असेही काहींनी म्हटले आहे.

You May Also Like