मिस्टर्स 360 चा चाहत्यांना मोठा धक्का, त्या निर्णयावर ठाम

मुंबई : मिस्टर्स 360 नावाने ओळख असलेल्या एबी डिव्हिलियर्सने चाहत्यांना मोठा धक्का दिला आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आपण पुनरागमन करणार नसल्याचं एबी डिव्हिलियर्सने स्पष्ट केलंय. एबी डिव्हिलियर्सने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन करायला नकार दिला आहे, त्यामुळे वेस्ट इंडिज दौर्‍यासाठीच्या टीममध्ये त्याची निवड झाली नाही, असं बोर्डाने सांगितलं. दक्षिण आफ्रिकेची टीम वेस्ट इंडिजमध्ये 2 टेस्ट आणि 5 टी-20 मॅचची सीरिज खेळणार आहे. 10 जूनपासून या दौर्‍याला सुरुवात होणार आहे.

एबी डिव्हिलियर्सने 2018 साली आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. त्याने 114 टेस्ट, 228 वनडे आणि 78 टी-20 आंतरराष्ट्रीय मॅच खेळल्या, यात त्याने 47 शतकं केली. एबीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली असली तरी आयपीएलमध्ये मात्र त्याने धमाका केला. यावर्षी 6 इनिंगमध्ये त्याने 51.75 च्या सरासरीने 207 रन केले.

एबी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन करेल, असे अंदाज वर्तवले जात होते. वेस्ट इंडिजविरुद्धच्या टी-20 सीरिजमध्येच एबीची दक्षिण आफ्रिकेच्या टीममध्ये निवड होईल, असं बोललं जात होतं. दक्षिण आफ्रिकेच्या क्रिकेट बोर्डानेही त्याच्याशी चर्चा केली, पण त्याने आपला निर्णय बदलायला ठाम नकार दिलायं.

You May Also Like