मुक्ताईनगर : सहा नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत वर्षा या निवासस्थानी हा पक्ष प्रवेश

मुक्ताईनगर : मुक्ताईनगर नगरपंचायतीतील सहा नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत वर्षा या निवासस्थानी हा पक्ष प्रवेश पार पडला. सहा नगरसेवकांमध्ये भाजपचे गटनेते यांचाही समावेश आहे. तर चार नगरसेवक उद्या प्रवेश घेणार आहेत. यावेळी मंत्री ना. गुलाबराव पाटील, एकनाथ शिंदे हे देखील उपस्थित होते.

मुक्ताईनगर नगरपंचायतीमध्ये भाजपला स्पष्ट बहुमत मिळालेले आहे. यात नजमा तडवी या लोकनियुक्त नगराध्यक्षा म्हणून निवडून आल्या असून यासोबत भाजपचे १२ नगरसेवक निवडून आले होते. हे सर्व नगरसेवक हे खडसे गटाचे समर्थक आहेत. एकनाथराव खडसे यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतरही येथील नगराध्यक्षा व इतर नगरसेवकांनी पक्षांतर केले नव्हते. अर्थात, ते खडसे समर्थक म्हणूनच ओळखले जात होते. मात्र अलीकडच्या काळात सत्ताधारी गटात कुरबुरी सुरू झाल्या. यातच दोन दिवसांपूर्वी आमदार चंद्रकांत पाटील यांच्या निधीतून मंजूर करण्यात आलेल्या कामांना बहुमताने मंजुरी देण्यात आल्याने राजकीय धुरिणांच्या भुवया उंचावल्या होत्या. याप्रसंगी नगराध्यक्षांसह सहा नगरसेवकांनी शिवसेनेला साथ दिल्याने आश्‍चर्य व्यक्त करण्यात आले होते. यावरून सत्ताधारी आणि विरोधकांनी एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपही केले होते.

या पार्श्‍वभूमिवर, आज मुक्ताईनगर नगरपंचायतीतील दहा नगरसेवक हे पालकमंत्री ना.गुलाबराव पाटील व आमदार चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत दुपारी मातोश्रीवर दाखल झाले. यातील सहा नगरसेवकांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवबंधन बांधले. तर चार जणांचा प्रवेश उद्या होणार आहे.

शिवसेनेत प्रवेश करणाऱ्या नगरसेवकांची नावे
पियुष महाजन (गटनेता), मुकेश वानखेडे, संतोष कोडी, शबाना अब्दुल अरिफ, नुसरत मेहबुब खान, बिलकीज बी अमान उल्लाखान यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे.

You May Also Like