मुंबई : तौक्ते चक्रीवादळामुळे रस्त्यावर तडफडणाऱ्याला पाेलिसामुळे मिळाली मदत

मुंबई : तौक्ते चक्रीवादळामुळे कोसळलेल्या एका झाडाआड दडून बसलेल्या सापावर किराणा माल घेऊन निघालेल्या तरुणाचा पाय पडला. पायाला सर्पदंश झाल्याचे लक्षात येताच तो घाबरला. सापाने पायाला वेटोळे मारले. त्याला काढत असताना पुन्हा हाताला चावा घेतला. वाचवा… वाचवा… म्हणून ताे जीवाच्या आकांताने ओरडत हाेता. दरम्यान, दुचाकीवरून घराकडे निघालेल्या पोलीस शिपायाने ताे आवाज ऐकला, तरुण नजरेस पडताच त्याच्याकडे धाव घेतली. तत्काळ त्याला रुग्णालयात नेले. तो तरुण सुखरूप घरी पोहोचेपर्यंत त्याची भावासारखी सेवाही केली. जनसेवेचा वसा घेतलेल्या आणि माणसातील माणुसकीचे दर्शन घडवणाऱ्या या पाेलिसाचे नाव याेगेश खेडकर असे आहे. मूळचे पुण्याचे रहिवासी असलेले खेडकर २०११ मध्ये पोलीस दलात दाखल झाले. २०१९ पासून ते गोराई पोलीस ठाण्यात कार्यरत आहेत. खेडकर सांगतात, आदल्या दिवशी रात्रपाळी करून घरी आलो. त्यानंतर १८ मे रोजी सुट्टी होती. मात्र कामानिमित्त बाहेर पडलो. काम उरकून घरी परतत असताना दुपारच्या सुमारास मनेरे गावाकडील रस्त्यावर पडलेल्या पाल्यापाचोळ्यात माेठ्याने ओरडत, तडफडणाऱ्या तरुणाकडे लक्ष गेले. तत्काळ त्याच्याकडे धाव घेतली. त्याच्या पायाला आणि हाताच्या बोटाला साप चावल्याचे समजले. लगेचच दाेरी शाेधली आणि विष शरीरात पसरू नये यासाठी ज्या ठिकाणी साप चावला होता, त्याच्या काही भाग वरती दोरीने घट्ट बांधून त्याला रुग्णालयात नेले.
रुग्णालयात सर्पदंशावरील औषध उपलब्ध नव्हते. ३ रुग्णालये फिरल्यावर चौथ्या रुग्णालयात औषध मिळाले. उपचार सुरू झाले. त्याचे नाव सुरेंद्र प्रताप असल्याचे समजले. ताे वाचला, याचे लाखमाेलाचे समाधान मिळाले, असे खेडकर यांनी सांगितले.

You May Also Like