मुंबई : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्या अडचणीत आणखी वाढ होण्याची शक्यता

मुंबई | राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर खंडणीखोरीचे आरोप केल्यानंतर मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्या अडचणीत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. परमबीर सिंग यांच्याविरोधात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे मयुरेश राऊत यांनी तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीत मयुरेश राऊत यांनी परमबीर सिंग आणि प्रदीप शर्मा यांच्या संपत्तीची चौकशी करण्याची मागणी केली आहे.

तसेच या दोन्ही अधिकाऱ्यांवर अपसंपदेची गुन्हा दाखल करावा, असेही या तक्रारीत म्हटले आहे. या तक्रारीची दखल घेऊन लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने तात्काळ तपासाला सुरुवात केली आहे. या अनुषंगाने मयुरेश यांचा जबाब नोंदवण्यासाठी त्यांना 24 मे ला ठाण्यातील एसीबीच्या कार्यालयात बोलावण्यात आले आहे.

तसेच, परमबीर सिंह यांच्यावर 24 मेपर्यंत अटकेची कारवाई करू नये, असा अंतरिम आदेश मुंबई उच्च न्यायालयाने शुक्रवारी मध्यरात्रीच्या सुमारास राज्य सरकारला दिला. सध्या उन्हाळी सुट्टी सुरु असल्यामुळे उच्च न्यायालयाकडून महत्त्वाच्या खटल्यांची सुनावणी व्हीडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सुरु आहे.

न्या. शाहरुख काथावाला व न्या. सुरेंद्र तावडे यांच्या खंडपीठाने शुक्रवारीही तब्बल 13 तास सलग न्यायालयीन कामकाज केले. त्यात रात्री दहाच्या सुमारास परमबीर यांच्या याचिकेवर सुनावणी सुरू केली. मात्र, मध्यरात्री १२ पर्यंतही सुनावणी पूर्ण होत नसल्याचे पाहून खंडपीठाने अखेरीस पुढील सुनावणी सोमवारी ठेवली आणि तोपर्यंत परमबीर यांच्यावर अटकेची कारवाई करू नये, असे निर्देश दिले आहेत.

You May Also Like