मुंबईमध्ये कोरोनाची रुग्णसंख्या कमी करण्यासाठी मुंबई महापालिका प्रयत्नशील

मुंबई : मुंबईमध्ये कोरोनाची रुग्णसंख्या कमी करण्यासाठी मुंबई महापालिका प्रयत्नशील आहे. या प्रयत्नांना यश येत आहे. मात्र, अद्यापही धोका कमी झालेला नाही. दुसरी लाट थोपवली जात असली तरी संभाव्य तिसरी लाट अधिक धोकादायक आहे, असे तज्ज्ञांचे मत आहे. ती राेखण्यासाठी पालिका सज्ज असून त्यासाठीच लसीकरण आणखी वेगाने करण्यात येईल. साेबतच बनावट लसीकरणाला आळा घालण्यासाठी प्रत्येक प्रभागामध्ये दोन भरारी पथके काम करत आहेत. या पथकांद्वारे प्रत्येक प्रभागातील लसीकरण माेहिमेचा आढावा घेऊन त्यावर बारकाईने लक्ष ठेवण्यात येईल, असे महापाैर किशाेरी पेडणेकर यांनी सांगितले.

प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना महापाैर म्हणाल्या की, बनावट लसीकरणाला आळा घालण्यासाठी प्रत्येक प्रभागामध्ये दोन भरारी पथके काम करत आहेत. कोणते रुग्णालय कसे काम करत आहे, याकडे आमचे लक्ष आहे. ‘सिरम’लादेखील पत्र दिले आहे. खऱ्या, खोट्या लसीबाबत स्पष्टीकरण मागितले आहे. पालिका आणि पोलीस चौकशी करत आहेत. कांदिवली येथील लसीकरणाच्या प्रकरणानंतर लोक घाबरले आहेत. सावधही झाले आहेत. महापालिकेने संबंधित ठिकाणी लसीकरणासाठी परवानगी दिली आहे का? याची चौकशी स्वत: नागरिक करत आहेत.

मुंबई आंतरराष्ट्रीय शहर आहे. येथे लांबून लोक येतात. कोरोनाचे संकट मुंबईत कमी झाले आहे, पण संपलेले नाही. कोरोनाची रुग्णसंख्या कमी होत आहे, पण धोका कायम आहे. महापालिका आपली यंत्रणा नीट राबवत आहे. दुसरी लाट थोपविली आहे. पण ती संपलेली नाही. तिचा परिणाम कायम आहे. आता जी लाट येईल ती दुप्पट किंवा तिप्पट असेल, असे तज्ज्ञ म्हणत आहेत. मात्र, आपण संयम बाळगला पाहिजे. नियमांचे पालन केले पाहिजे, असे आवाहन महापाैरांनी केले.

…तरच लोकल सुरू करण्याबाबत विचार!

केंद्र सरकारकडून राज्याला वेळेवर लस मिळेल, अशी अपेक्षा आहे. मतदार म्हणण्यापेक्षा नागरिकांना विनंती आहे की, हा शत्रू दिसत नाही. कोरोनाचा धोका कायम आहे. आपले कौतुक झाले की जबाबदारी वाढते. त्यामुळे जबाबदारीचे भान आम्हाला आहे. हे भान ठेवून आम्ही काम करत आहोत. लोकल सुरू करण्याचा विचार करायचा झाला तर आजही दिवसाला पाचशे ते सहाशे रुग्ण सापडत आहेत. त्यामुळे रुग्णसंख्या कमी झाली तरच लोकल सुरू करण्याचा विचार करू. लोकांच्या जीवावर बेतेल, असे काही करणार नाही, असे महापौरांनी स्पष्ट केले. किशोरी पेडणेकर यांनी सांगितले.

You May Also Like