मुंबई : ‘एकाचं लक्ष मुंबईवर अन् दुसऱ्याचं बारामतीवर, उर्वरीत महाराष्ट्र वाऱ्यावर’

मुंबई – एकाचे मुंबई तर दुसऱ्याचे बारामतीवर लक्ष आहे. उर्वरित राज्य वाऱ्यावर सोडण्यात आले आहे. हे सरकार म्हणजे सह्याजीराव झाले असल्याचा आरोप वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी केला. आंबेडकर यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री दोघांनाही लक्ष्य केलंय. तसेच, कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत राज्य सरकार फोल ठरल्याचंही त्यांनी म्हटलं.

आंबेडकर यांनी अकोला येथे शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत राज्य सरकारवर टीका केली. यावेळी राज्यातील आपातकालीन व्यवस्थेबाबत राज्य सरकार गंभीर नसल्याचा आरोप त्यांनी केला. कोरोना विषाणू कोविड-१९ च्या पहिल्या लाटेत उपाचारासाठी उभी केलेली यंत्रणा बळकट करण्याऐवजी ती मोडून टाकण्यात आली. त्यामुळे दुसरी लाट आली तेव्हा उपचाराविना माणसं मेली, असे म्हणत कोरोनाचे संकट हाताळण्यात राज्य सरकार अपयशी ठरल्याचं आंबेडकर यांनी म्हटलं.

कोविड विषाणू संसर्गाच्या संकटात आपातकालीन व्यवस्थापनावर राज्य शासनाला आलेल्या अपयशाबाबत व तिसरी लाट थोपविण्यासाठी करावयाच्या उपाय योजनांबाबत मुख्यमंत्र्यांचे मुंबई तर उपमुख्यमंत्र्यांचे बारामतीवरच लक्ष आहे. उर्वरित महाराष्ट्र वाऱ्यावर असल्याचा आरोप ॲड. आंबेडकर यांनी केला. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांनी काम नाही केलं तरी चालेल, पण राज्यातील आपात्कालीन समित्या बळकट करा. त्यामुळे नागरिकांना वेळेवर उपाचाराबाबत व आपत्कालीन व्यवस्थापनाबाबत योग्य सल्ला या समित्या देवून मदत करू शकतील, असा सल्लाही त्यांनी राज्य सरकारला दिला.

कोविडची दुसरी लाट अनियंत्रित झाल्याने राज्य सरकार अपयशी ठरल्यात असल्याने ते बरखास्त का करण्यात येऊ नये असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला होता. त्या प्रश्नावरुन आंबेडकर यांनी सरकारला सह्याजीराव असं म्हटलंय. सध्याच्या परिस्थितीत सह्या करण्यासाठी कुणीतरी लागतं. सरकार बरखास्त केलं तर सह्या कोण करेल? त्यामुळे हे सह्याजीराव सरकार सुरू असल्याचे ते म्हणाले. दरम्यान, राज्यात एकीकडे कोरोनाचं संकट असून दुसरीकडे तौत्क्ता चक्रीवादळाचाही सामना राज्य सरकारला करावा लागत आहे.

You May Also Like