मुंबई – सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द ठरवल्यापासून महाराष्ट्रातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे

मुंबई – सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द ठरवल्यापासून महाराष्ट्रातील सामाजिक आणि राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. दरम्यान, मराठा आरक्षण रद्द झाल्याने आरक्षणाच्या मुद्द्यावरून खासदार संभाजीराजे छत्रपती आक्रमक झाले आहेत. आरक्षणाच्या प्रश्नावर राज्यव्यापी दौरा केल्यानंतर त्यांनी आज राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार यांची भेट घेतली. या भेटीमध्ये सकारात्मक चर्चा झाल्याचे सांगत संभाजीराजे यांनी मोठे विधान केले आहे.

या भेटीनंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना खासदार संभाजीराजे छत्रपती म्हणाले की, आज राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांची मी भेट घेतली. या भेटीत सकारात्मक चर्चा झाली. गेल्या काही दिवसांत मी राज्यात फिरून मी मराठा समाजाच्या भावना जाणून घेतल्या होत्या. या भेटीवेळी मी राज्यातील मराठा समाज किती अस्वस्थ आणि दु:खी आहे हे शरद पवार यांना सांगितले. तसेच मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर तुम्ही पुढाकार घेणे गरजेचे असल्याचेही त्यांना सांगितले. मराठा आरक्षणासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, नारायण राणे यांच्यासह सर्वच नेत्यांनी एकत्र येण्याची गरज आहे. तसेच मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर आता मी मुख्यमंत्र्यांचीही भेट घेणार आहे, असे खासदार संभाजीराजे यांनी सांगितले.

दरम्यान, मराठा आरक्षण रद्द झाल्यामुळे मराठा समाजात प्रचंड अस्वस्थता निर्माण झाली आहे. या परिस्थितीत माझे – तुझे न करता केंद्र आणि राज्य सरकारने तातडीने समाजासाठी काय करता येईल यासाठी पावले उचलणे आवश्यक आहे, असे काल संभाजीराजे म्हणाले होते.

You May Also Like