मुंबई : राज्यात लॉकडाउन पुन्हा वाढणार का? आदित्य ठाकरेंचं सूचक विधान

मुंबई  : राज्यात कोरोनाचा संसर्ग वाढू नये म्हणून राज्यात लॉकडाऊन लावण्यात आला आहे. 1 जूनपर्यंत राज्यात लॉकडाऊन असणार आहे. पण, तरीही कोरोनाबाधित रुग्णांची संख्या कमी होताना दिसत नाही. रुग्ण संख्या कशी राहिल यावर पुढील लॉकडाऊनचा निर्णय राहिल, असं सूचक वक्तव्य पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी केले आहे.

‘कोरोनाबाधित रुग्णांची संख्या आटोक्यात आणण्यासाठी अथक प्रयत्न केले जात आहे. लॉकडाऊनचा निर्णय पुन्हा वाढवण्यात येणार याबद्दल आता बोलणे हे घाईचे ठरणार आहे. कोरोनाबाधित रुग्णांची संख्या कमी करण्यावर सर्वपरीने प्रयत्न सुरू आहे, संख्या कमी झाल्यानंतरच पुढील निर्णय घेण्यात येईल, असंही आदित्य ठाकरे यांनी स्पष्ट केलं.

दरम्यान, महाराष्ट्रात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता राज्य सरकारने 5 एप्रिल 2021 रोजी ब्रेक द चेन अंतर्गत कठोर नियम लागू केले. त्यानंतर सुद्धा कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता 14 एप्रिल रोजी रात्री 8 वाजल्यापासून 1 मेपर्यंत राज्यात संचारबंदी लागू करण्यात आली. यानंतर पुन्हा कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता सरकारने हे निर्बंध 15 मे 2021 पर्यंत लागू ठेवण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर पुन्हा एकदा राज्य सरकारने कठोर निर्बंध कायम ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

ब्रेक दि चेन अंतर्गत राज्यातील कडक निर्बंध 1 जूनपर्यंत वाढवण्यात आला आहे. सुरुवातीला 31 मे पर्यंत कठोर निर्बंध वाढवण्यासंदर्भात निर्णय घेण्यात आला होता, मात्र तो आणखी एक दिवस वाढवण्यात आला. या काळात दुग्ध व्यवसाय करणाऱ्यांना मुभा देण्यात आली आहे, तसंच घरपोच सेवा विक्री यासाठीही परवानगी कायम आहे. त्याचबरोबर इतर राज्यातून महाराष्ट्रात येण्यासाठी 48 तास आधी कोरोनाची आरटीपीसीआरटी टेस्ट गरजेची आहे. परराज्यातून माल वाहतूक करणारे गाड्यांमध्ये आता दोन जणांना प्रवास मुभा असेल. त्यासाठी देखील आरटीपीसीआर टेस्ट गरजेची असणार आहे.

You May Also Like