महापालिकेतील अधिकारी मजिप्राच्या अधिकार्‍यांना मदत करतात!

नगरसेवक सुनिल बैसाणे यांचा स्थायीच्या सभेत आरोप
धुळे : शहरात वेगवेगळ्या ठिकाणी सुरू असलेले काम मजिप्राकडे वर्ग करण्यात आले आहे. मजिप्राच्या ठेकेदाराने मनमानी कारभार सुरू ठेवला आहे. ठेकेदाराकडून बदनामी करण्याची धमकी देण्यात येते, खंडणी मागण्यात येत असेल तर ही विचार करण्यासारखी बाब आहे. महापालिकेतील अधिकारीही मजिप्राच्या ठेकेदारांना मदत करत असल्याचा आरोप माजी स्थायी समिती सभापती सुनिल बैसाणे यांनी स्थायी समितीच्या सभेत केला.

भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी सभागृहात घेण्यात आलेल्या ऑन लाईन स्थायी समितीच्या सभेप्रसंगी सभापती संजय जाधव, अति.आयुक्त नितीन कापडणीस, प्रभारी नगरसचिव म्हणून उपायुक्त शांताराम गोसावी उपस्थित होते. यावेेळी स्थायीतील सदस्यांनी शहरातील कचरा, पाणी आणि वीजेच्य समस्या नगरसेवकांनी मांडल्या. मजिप्राने केलेले काम निकृष्ट दर्जाचे असल्याने त्याचा त्रास नागरीकांना सहन करावा लागतो आहे. त्यामुळे अपघातांच्या संख्येतही वाढ होऊ लागली आहे. खा.डॉ.सुभाष भामरे यांच्या प्रमुख उपस्थितीत मजिप्राच्या अधिकार्‍यांची बैठक घेण्यात आली होती. त्यावेळी मजिप्राच्या अधिकार्‍यांना कामाचा दर्जा आणि परिपूर्णता याबाबत सुचना देण्यात आल्या होत्या. परंतू कोणत्याही सुचनांची अंमलबजावणी करण्यात आलेली नसल्याचे नगरसेविका भारती माळी यांनी सांगितले. मनपातील महत्वाच्या नस्ती गहाळ होतात. त्या कोणी नेल्या ? हे कालांतराने कळाल्यानंतरही कारवाई करण्यासाठी मनपा प्रशासन पुढे येत नाही.

नगरसेविका हिना पठाण यांनी आपल्या परिसरात घंटागाडी येत नसल्याची तक्रार केली. घंटागाडी चालकाशी संपर्क साधला असता बॅटरी चोरीला गेल्याचे कारण सांगितले गेले. प्रत्यक्ष पाहणी केली असता घंटागाडीची चारही चाके चोरीला गेली असून केवळ दगडांवर गाडी उभी आहे. जिओ कंपनीने दिलेला निधी कुठे वापरला गेला ? या बाबत माहिती द्यावी अशी मागणी पठाण यांनी केली. त्यावर अभियंता कैलास शिंदे यांनी निधी संदर्भातील सविस्तर माहिती देण्यात येईल असा खुलासा केला.

खाली बसून आंदोलन
सुरूवातीपासूनच कचर्‍याच्या समस्येबाबत तक्रार करत आलो. आता पर्यंत कचर्‍याची समस्या सुटू शकली नाही. कचर्‍याची समस्या सुट नाही तोपर्यंत खुर्चीवर बसणार नाही असे म्हणत खाली बसून समाजवादी पार्टीचे नगरसेवक अमीन पटेल यांनी आंदोलन केले. खाली बसून कचर्‍याच्या समस्या मांडत असतांना माजी स्थायी समिती सभापती सुनिल बैसाणे, नगरसेवक शितल नवले व नगरसेवक सईद बेग यांनी विनंती केल्यानंतर अमीन पटेल स्वत:च्या जागेवर बसले.

मजिप्राला मनपात बैठकीला बोलवा!
मजिप्राच्या ठेेकेदाराच्या कामासंदर्भात स्थायी सभेत वारंवार तक्रार केलीे आहे. एवढेच नव्हे तर खा.डॉ.भामरे यांनी स्वतंत्र बैठक बोलवून मजिप्राच्या अधिकार्‍यांना कामातील ढिलाईबाबत तंबी दिली होत. भाजपाचे जिल्हाध्यक्ष अनुप अग्रवाल यांनी देखील मजिप्राच्या अधिकार्‍यांना शहरातील कामाबाबत खडे बोल सुनावले होते. त्याकडेही मजिप्राचा ठेकेदार दुर्लक्ष करतो. यानंतरच्या होणार्‍या स्थायीच्या सभेला मजिप्राच्या अधिकार्‍यांनाही हजर राहण्याची सुचना पाठविण्यात यावी.

घंटागाड्या ताब्यात द्या
मनपाने नवीन घेतलेल्या घंटागाड्यांची प्रचंड दुरवस्था आहे. परिणामी कचरा संकलनासाठी वेळेवर घंटागाड्या पोहचू शकत नाही. काही गाड्यांची चारही चाके, बॅटरी, इतर भाग चोरीच्या घटना वाढल्या आहेत. मनपाने प्रभाग क्र.4 मध्ये नेमण्यात आलेल्या चारही घंटागाड्या आपल्या ताब्यात द्याव्यात, आपण स्वखर्चाने त्यांची देखभाल करू असे मत नगरसेवक नागसेन बोरसे यांनी सभेप्रसंगी व्यक्त केले.

You May Also Like

error: Content is protected !!