नागपूर : चिंता वाढली! महाराष्ट्रातील या जिल्ह्यात म्युकरमायकोसिसमुळे 26 जणांचा मृत्यू

नागपूर | महाराष्ट्रात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने हाहाकार माजवला असतानाच नव्या आजाराने तोंड वर काढले आहे. म्युकरमायकोसिस या नव्या आजारामुळे सर्वांच्या चिंतेत भर पडली आहे. डोंबिवलीमध्ये सुरुवातीला या आजारामुळे एक व्यक्ती मृत पावल्यानंतर हळूहळू मृतांचा आकडा वाढायला सुरुवात झाली आहे.

महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमध्ये आता या नव्या आजाराचे रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळून येत आहेत. आरोग्य यंत्रणाही या आजाराशी सामना करण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करत आहे. नागपूरमध्ये पहिला लाटेपासूनच कोरोना रुग्णसंख्या झपाट्याने वाढत होती. त्यातच नागपूरमध्ये आता म्युकरमायकोसिसने मोठ्या प्रमाणात शिरकाव केला आहे.

म्युकरमायकोसिस या आजारामुळे नागपूरमध्ये आतापर्यंत 26 रुग्णांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. म्युकरमायकोसिसच्या 600 पेक्षा जास्त रुग्णांवर आतापर्यंत नागपूरमध्ये उपचार करण्यात आले असल्याची माहिती डॉ. प्रशांत निखाडे यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना दिली आहे.

दरम्यान, कोरोना उपचारानंतर रुग्णांमध्ये म्युकरमायकोसिसची लक्षणं मोठ्या प्रमाणात आढळून येत असल्याने नागपूर कोरोना बरोबरच आता म्युकरमायकोसिसचा देखील हॉटस्पॉट बनत चालला असल्याचे भयावह चित्र पाहायला मिळत आहे. त्यामुळे प्रशासनातर्फे नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

You May Also Like