‘झुंड’वरुन होणाऱ्या टीकांवर नागराज मंजुळेंनी दिले स्पष्टीकरण

नागराज मंजुळे दिग्दर्शित ‘झुंड’ हा बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित चित्रपट प्रदर्शित होऊन पाच दिवस उलटले आहेत. बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते अमिताभ बच्चन यांनी या चित्रपटात प्रमुख भूमिका साकारली आहे. सध्या हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई करत असल्याचे दिसत आहे. ‘झुंड’ या चित्रपटाची अनेक चित्रपट समीक्षक तसेच कलाकार कौतुक करताना दिसत आहे. तर काहींनी या चित्रपटावर अप्रत्यक्ष किंवा प्रत्यक्षपणे टीकाही केली आहे. दरम्यान नुकतंच नागराज मंजुळे यांनी या टीकांवर स्पष्टीकरण दिले आहे.
महाराष्ट्रात नागराज मंजुळे दिग्दर्शित झुंड चित्रपट प्रदर्शित होऊन पाच दिवस उलटून गेली आहेत. समाजाचे दुहेरी वास्तव दाखणाऱ्या या चित्रपटाला प्रेक्षकांनी चांगलीच पसंती दाखवली होती. काही दिवसांपूर्वी नागराज मंजुळे यांनी साम टीव्हीला एक मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यांनी झुंड चित्रपटाबद्दल, त्यातील कलाकारांबद्दल भाष्य केले. यावेळी त्यांनी या चित्रपटावर होणाऱ्या टीकेबद्दलही प्रत्युत्तर दिले.
यावेळी नागराज मंजुळे म्हणाले, “सोशल मीडिया हे माध्यम मला मशिनसारखे वाटते. त्याला डोकं नसतं. चेहरा नसतो. त्यामुळे त्या ठिकाणी झालेल्या टीकांना मी गांभीर्याने घेत नाही.”
“जर एखाद्या व्यक्तीला या चित्रपटाबद्दल खरच तक्रार करायची असेल तर त्याने माझ्यासमोर येऊन करावी. सोशल मीडियावर अनेकजण तक्रार करतात. या चित्रपटात जर काही चुका असतील आणि त्या जर तुम्ही मला प्रत्यक्ष सांगितल्या तर तुम्हाला नक्की काय सांगायचे आहे हे माझ्या लक्षात येईल”, असेही नागराज मंजुळे म्हणाले.
“मला जे काही सांगायचे होते ते मी चित्रपटातून सांगितले आहे. आता त्याला वेगळी पुरवणी जोडायची काय गरज? असा प्रश्न नागराज यांनी यावेळी विचारला. आपण एकमेकांना प्रेमाचा हात देऊन पुढे जावे. त्यांना मागे खेचू नये, हाच माझ्या चित्रपटाचा हेतू आहे”, असेही त्यांनी सांगितले.

You May Also Like