नाना पटोलेंची मोठी घोषणा; काँग्रेसकडून 111 अ‍ॅम्ब्युलन्स व 61 लाख मास्कचे करणार वाटप

मुंबई : माजी पंतप्रधान भारतरत्न स्व. राजीव गांधी यांच्या पुण्यतिथीचे औचित्य साधून काँग्रेस पक्षाने विविध समाजोपयोगी उपक्रमांचा शुभारंभ केला आहे. कोरोनाच्या संकटकाळात नागरिकांच्या मदतीसाठी काँग्रेस पक्षाच्या आमदारांच्या निधीतून 111 अ‍ॅम्ब्युलन्स देण्यात येणार आहेत. तसेच राज्यभरात 61 लाख मास्कचे वाटप केले जाणार असल्याची घोषणा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केली.

संकटकाळात काँग्रेस पक्ष कायमच या देशातील नागरिकांसोबत राहिला आहे. कोरोना संकट काळात काँग्रेस पक्षाकडून सातत्याने मदत कार्य सुरु आहे. आज राजीवजींच्या हौतात्म्य दिनी हाच जनसेवेचा वारसा पुढे घेऊन जात काँग्रेस पक्षातर्फे राज्यभरात 111 अ‍ॅम्ब्युलन्स देण्यात येणार असून यासंदर्भातील पत्रं आमदारांनी संबंधित जिल्हाधिकारी यांच्याकडे सुपूर्द केली आहेत. तसेच राज्यभरात 61 लाख मास्कचे वाटप केले जाणार आहे. महाराष्ट्र काँग्रेस तर्फे 51 लाख आणि मुंबई काँग्रेस तर्फे 10 लाख मास्क वाटप करण्यात येणार आहे, असे नाना पटोले यांनी सांगितले.

माजी पंतप्रधान स्व. राजीव गांधी यांच्या स्मृतीदिनानिमित्त महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीतर्फे चेंबूरच्या नालंदा हॉलमध्ये अभिवादन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी नाना पटोले म्हणाले की, दिवंगत पंतप्रधान स्व. राजीव गांधी हे दूरदृष्टीचे नेते होते. देशातील तरुणाईची ताकद जगाला दाखवून देण्याचा त्यांचा संकल्प होता. 20 व्या शतकातच भारताला 21 व्या शतकाचे स्वप्न त्यांनी दाखवले आणि त्यादृष्टीने पाऊले उचलली. असे सांगितले.

 

You May Also Like

error: Content is protected !!