नाशिक : डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयातील प्राणवायू टाकीची दुरुस्ती

नाशिक : 21 एप्रिल (बुधवारी ) नाशिक येथील डॉ. हुसेन रुग्णालयातील टाकीला गळती होऊन प्राणवायूअभावी २४ रुग्णांचा मृत्यू झाला.  दरम्यान, प्राणवायूअभावी २४ रुग्णांचा हकनाक बळी जाण्यास कारणीभूत ठरलेल्या महानगरपालिकेच्या डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयातील प्राणवायू टाकीच्या दुरुस्तीचे काम तीन दिवसांनी पूर्णत्वास गेले. टाकीतील प्राणवायू वितरण व्यवस्थेची २४ तास चाचणी घेण्यात येणार आहे. मंगळवारी नाशिक रोडच्या बिटको करोना रुग्णालयातील प्राणवायूच्या टाकीचे तंत्रज्ञांकडून परीक्षण करण्यात येणार आहे.

या रुग्णालयात १३ किलो लिटर, तर बिटको रुग्णालयात २० किलो लिटर क्षमतेची टाकी पुण्यातील टायो निपॉन सान्सो कॉर्पोरेशनकडून भाडेतत्त्वावर घेण्यात आलेली आहे.  गळती झाली तेव्हा कंपनीचे तंत्रज्ञ नव्हते. स्थानिक तंत्रज्ञांच्या मदतीने तात्पुरत्या स्वरूपात दुरुस्ती करावी लागली होती. दुर्घटनेनंतर कंपनीचे प्रतिनिधी तब्बल ४८ तासांनंतर शहरात आले. महापालिकेने गळती झालेल्या टाकीची दुरुस्ती, डॉ. झाकीर हुसेन आणि बिटको रुग्णालयातील प्राणवायू व्यवस्थेच्या नियमित तपासणीसाठी कंपनीचा तंत्रज्ञ ठेवण्याचे निर्देश दिले आहेत.

या घडामोडीनंतर डॉ. हुसेन रुग्णालयातील टाकीच्या प्राणवायू वितरण व्यवस्थेच्या दुरुस्तीचे काम तीन दिवसांत पूर्ण करण्यात आले. यासाठी मुख्य टाकीतून प्राणवायूचा पुरवठा बंद ठेवण्यात आला. तत्पूर्वी पर्यायी व्यवस्था म्हणून प्रत्येकी एक किलोलिटर क्षमतेच्या दोन टाक्या बसविल्या गेल्या. प्राणवायूचा टँकर तैनात ठेवला. महापालिकेने १०६ लहान-मोठे सिलिंडर आणले. नव्या टाकीतून रुग्णांना प्राणवायूचे वितरण योग्य प्रकारे सुरू करण्यात आले.

मूळ टाकीतील व्यवस्थेची दुरुस्ती करण्यात आली. या कामास दीड-दोन तासांचा अवधी लागला; पण त्यासाठी बरीच पूर्वतयारी करावी लागली. दुरुस्तीनंतर मूळ टाकीतून प्राणवायू वितरण सुरू करण्यात आले.

दरम्यान, पुढील २४ तास चाचणी घेतली जाणार आहे. नंतर तंत्रज्ञांकडून अंतिम निर्णय घेतला जाईल, असे करोना कक्ष अधिकारी डॉ. आवेश पलोड यांनी सांगितले. दरम्यान, मंगळवारी सकाळी तंत्रज्ञ नाशिक रोडच्या बिटको रुग्णालयातील टाकीचे परीक्षण करणार आहेत.

आमच्या व्हॉटस्अ‍ॅप गृपला जॉईन होण्यासाठी ब्लू लाईनला टच करा

https://chat.whatsapp.com/C2lBmNXGceHGLS7IeE

You May Also Like