नाशिक महापालिका खरेदी करणार स्पुटनिक लस

नाशिक : रशियाच्या स्पुटनिक लशीचे देशात उत्पादन सुरू करण्यात आले असून त्या पार्श्वभूमीवर महापालिकेने ही लस खरेदी करण्यावर शिक्कामोर्तब केले.  स्पुटनिक या नव्याने विकसित झालेल्या लशीत एका मात्रेने प्रतिकार शक्तीत वाढ होत असून तीच लस महापालिकेला मिळणार आहे. लसीकरणाच्या मुद्द्यावर सत्ताधारी आणि प्रशासनाची नुकतीच बैठक झाली. १८ ते ४४ वयोगटाच्या लसीकरणावर भर देण्याबाबत बैठकीत विचार-विनिमय करण्यात आला. यामुळे निर्णयामुळे शहरातील १८ ते ४४ वयोगटातील साडेपाच लाख नागरिकांना लसीकरण करता येणार आहे.

महापालिका आयुक्त कैलास जाधव यांनी बृहन्मुंबई महापालिका प्रशासनाशी चर्चा केली. रशियाच्या स्पुटनिक लशीसाठी एकाने पुरवठ्याची तयारी केली आहे. आणखी लस मिळाव्यात म्हणून निविदेला मुदतवाढ देण्याचे निश्चित करण्यात आले. नाशिक महापालिकेने रशियन निर्मित लस खरेदीची तयारी दर्शविल्याने मुंबई महापालिकेत निविदा भरणाऱ्या पुरवठादाराने महापालिका आयुक्त जाधव यांची भेट घेऊन २१०० रुपये दर सांगितला. निविदा प्रक्रिया अंतिम होताना मुंबई महापालिका जो दर निश्चित करेल तो दर देण्यास नाशिक महापालिकेने संमती दर्शविली आहे. बृहन्मुंबई  महापालिकेला दिलेल्या दरानुसार पाच लाख लशींची खरेदी करण्याची तयारी असल्याचे पत्र महापालिकेने पुरवठादारास दिले. १८ ते ४४ वयोगटाच्या लसीकरणासाठी महापालिका प्रशासनाने स्पुटनिक या रशियन लस खरेदीत संमती दर्शविली.

रशियन स्पुटनिकच्या एका मात्रेने प्रतिकार शक्तीत वाढ होते. यामुळे लसीकरण जलदगतीने होईल. दोन वेळा नागरिकांना लसीकरणासाठी जाण्याची गरज पडणार नाही. महापालिका स्पुटनिक खासगी रुग्णालयांना उपलब्ध करणार आहे. करोनासाठी महागड्या औषधांवर मोठा खर्च करावा लागतो. मात्र प्रतिबंधक लस घेण्यास नाशिककर तयार आहेत. – कैलास जाधव (आयुक्त, नाशिक महापालिका)

 

You May Also Like