नाशिक ऑक्सिजन गळती : मृतांच्या वारसांना ५ लाख रुपयांची मदत जाहीर!

नाशिक : नाशिकमध्ये आज धक्कादायक घटना घडली आहे. नाशिकच्या डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयाच्या टाकीला दुपारी १२ च्या सुमारास मोठ्या प्रमाणात गळती सुरु झाली. झाकीर हुसेन रुग्णालयात ऑक्सिजन टाकीतून गळती झाल्याने २२ रुग्णांना आपला जीव गमवावा लागला आहे.

दरम्यान,  या मृतांच्या वारसांना ५ लाख रुपयांची मदत देण्याची घोषणा राज्य सरकारकडून करण्यात आली आहे. राज्याचे अन्नपुरवठा मंत्री आणि नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी ही माहिती दिली.

छगन भुजबळ यांनी  दुपारी घटनास्थळाला भेट दिल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. “ही अतिशय दु:खद घटना असून करोनाशी लढा सुरू असताना अशी दुर्घटना होणं हे अतिशय दुर्दैवी आहे”, असं देखील भुजबळ यावेळी म्हणाले. दरम्यान, या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं.

या दुर्घटनेची चौकशी करण्यासाठी सरकारकडून ३ सदस्यीय समितीची स्थापना केली असून यामध्ये एक आयएएस अधिकारी, एक इंजिनिअर आणि एका डॉक्टरचा समावेश आहे. “ऑक्सिजन कसा लीक झाला याची चौकशी करणाऱ्या समितीमध्ये एक इंजिनिअर देखील मुख्यमंत्र्यांनी ठेवला आहे. याची चौकशी झाल्याशिवाय दोषी ठरवता येणार नाही. पण ते शोधणं गरजेचं आहे. त्यासाठी याची उच्चस्तरीय समितीच्या मार्फत चौकशीचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत”, असं भुजबळ यावेळी म्हणाले.

मृतांच्या नातेवाईकांचे अश्रू कसे पुसू ? नाशिकच्या घटनेने मुख्यमंत्री झाले भावूक

‘हे दुःख व्यक्त करण्यासाठी माझ्याकडे शब्द नाहीत. एकाएका कोरोना रुग्णास सावरण्यासाठी महाराष्ट्र शासन शर्थ करीत असताना असा अपघात आघात करतो. राज्याची संपूर्ण यंत्रणाच या युद्धात स्वतःला वाहून घेत आहे. मृतांच्या नातेवाईकांचे सांत्वन कसे करू? त्यांचे अश्रू कसे पुसू? अपघात असला तरी मृतांच्या नातेवाईकांचे दुःख मोठे आहे’ अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे  यांनी नाशिक येथील झाकीर हुसेन रुग्णालयात ऑक्सिजन टँक लीक दुर्घटनेवर आपली भावना व्यक्त केली.

You May Also Like

error: Content is protected !!