‘बारामतीचा नथुराम गोडसे…’, पवार यांच्याबद्दल आक्षेपार्ह ट्विट, दिंडोरी पोलिसांनी घेतलं युवकाला ताब्यात

नाशिक । राष्ट्रवादीचे अध्यक्ष खा. शरद पवार यांच्यावर आक्षेपार्ह ट्विट करणाऱ्या युवकाला नाशिकच्या दिंडोरी पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. आक्षेपार्ह ट्वीटचा स्क्रीन शॅाट गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी शेअर केला होता. त्यानंतर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी त्याचा शोध घेतल्यानंतर हा युवक पोलिसांच्या हाती लागला.
निखिल भामरे असं अटक करण्यात आलेल्या युवकाचे नाव आहे. या तरुणाविरोधात कारवाई करावी असं ट्वीट मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केलं होतं. यानंतर निखिल भामरेला चौकशीसाठी पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. त्याच्या मोबाईलमध्ये आक्षेपार्ह डेटा आढळल्याने खळबळ उडाली आहे.
जितेंद्र आव्हाड यांनी शेअर केलेल्या निखिल भामरेच्या ट्वीटच्या स्क्रिनशॉमध्ये ‘वेळ आहे बारामतीच्या गांधीसाठी, बारामतीचा नथुराम गोडसे तयार करण्याची’ असा मजकूर लिहिला होता.
याबाबत सोशल मीडियाच्या माध्यमातून खोट्या नावाने अकाउंट उघडून धमकी देणाऱ्या युवकाबाबत माहिती मिळालावर राष्ट्रवादी युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष पुरुषोत्तम कडलग यांनी जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांना निखिल भामरे याचा शोध घेण्यास सांगितले.
काल रात्री निखिल भामरे हा युवक दिंडोरी येथे असल्याचे समजले. राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष श्यामराव हिरे, तोसिफ मनियार यांनी त्यास पकडले. राष्ट्रवादी युवक काँग्रेसने आपल्या स्टाईलने त्याच्या पालकांसमोर निखिल भामरे यास समज दिली. त्यानंतर दिंडोरी पोलिसांच्या ताब्यात दिले. दिंडोरी पोलिसांनी त्याच्याविरोधात कलम २९४,१५३(अ), ५००, ५०१, ५०४, ५०६ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.

You May Also Like