ऐकावं ते नवलंच…दोन भूतांनी त्याला दिली जीवे मारण्याची धमकी ?

मुंबई : तुम्ही याआधी कधीच ऐकली नसेल अशी एक घटना गुजरातच्या पंचमहाल जिल्ह्यातील जांबुधोदा तहसीलच्या जोतवाड गावात समोर आली आहे. या गावात राहणाऱ्या एका व्यक्तीने जांबुधोडा पोलीस स्टेशनमध्ये एक तक्रार केली आहे. या व्यक्तीच्या म्हणण्याप्रमाणे, जेव्हा तो शेतात काम करत होता त्यावेळी तिथे दोन भूतं आली आणि त्याला जीवे मारण्याची धमकी त्यांनी दिली. इतकंच नव्हे तर ती भूतं मानसिकरित्या त्रासंही देत असल्याचं त्यांचं म्हणणं आहे.

वरसंगभाई बारिया यांच्या सांगण्यावरून जांबुधोडा पोलिसांनी तक्रार दाखल करून घेतली. या तक्रारीच्या आधारावर पोलिसांनी तपास देखील केला. मात्र या तपासादरम्यान वरसंगभाई बारिया मानसिकरित्या आजारी असल्याचं समोर आलं.

जांबुधोडा पोलिसांनी भूतांच्या माध्यमातून जीवे मारण्याची धमकी मिळाली तेव्हा पोलीस देखील हैराण झाले. यानंतर पोलिसांनी शेतात जाऊन तपासणीही केली. शेतात काहीही हाती लागलं नाही तेव्हा वरसंगभाई यांच्या कुटुंबियांशी चर्चा केली असता, तो मानसिक दृष्ट्या आजारी असल्याचं लक्षात आलं.

वरसंगभाई यांच्या कुटुंबियांना त्यांनी पोलिसांमध्ये तक्रार दिल्याची कल्पना नव्हती. दरम्यान वरसंगभाई यांची मानसिक परिस्थिती ठीक नसल्याने पोलिसांनी त्यांच्यावर कोणतीही कारवाई केली नाही.

जांबुधोडा पोलिसांच्या सांगण्यानुसार, जर कोणी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार घेऊन येत असेल तर त्यांची तक्रार नोंदवून घेणं हे आमचं काम आहे. आम्हाला पहिल्यापासूनच या प्रकरणामध्ये काहीतरी गडबड असल्याचा संशय होता. मात्र आम्ही पूर्ण माहिती घेतली त्यानंतर त्याच्या कुटुंबियांशी चर्चा केली. कुटुंबियांच्या सांगण्यानुसार आम्ही मनोचिकित्सकांशी त्यांचा संपर्कही करून दिला.

भूत जीवे मारण्याची धमकी देऊन गेल्याची तक्रार नोंदवणारे वरसंगभाई यांचे भाऊ महेश बारिया यांच्या सांगण्यानुसार, गेल्या एका वर्षापासून वरसंगभाई यांचं मानसिक संतुलन ठीक नाहीये. या आजारासाठी त्यांची औषधंही सुरु आहेत. मात्र गेल्या 10 दिवसांपासून त्यांनी औषधं घेतली नव्हती.

You May Also Like