नवनीत राणांची खासदारकी राहणार.. हायकोर्टाच्या निर्णयाला स्थगिती

मुंबई : अमरावती मतदारसंघाच्या अपक्ष खासदार नवनीत रवी राणा यांना सुप्रीम कोर्टानं मोठा दिलासा दिला आहे. नवनीत राणा यांचे जातवैधता प्रमाणपत्र रद्द करण्याच्या मुंबई हायकोर्टाच्या निर्णयाला सुप्रीम कोर्टानं स्थगिती दिली आहे. त्यामुळे नवनीत राणा यांच्या खासदारकीवर येणारं संकट टळलं आहे.

मुंबई हायकोर्टानं नवनीत राणा यांचं जातवैधता प्रमाणपत्र फेटाळून लावत दोन लाखांचा दंड ठोठावला होता. त्यासोबतच सहा आठवड्यात जातीचा दाखला व जातवैधता प्रमाणपत्र जमा करण्याचे आदेश दिले होते. नवनीत रवी राणा यांनी फसवणूक करून व बनावट कागदपत्रे सादर करून जात प्रमाणपत्र मिळवले आहे, असा ठपका न्यायालयाने ठेवला होता. कोर्टाच्या या निर्णयाविरोधात नवनीत राणा यांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती. त्यावरील सुनावणीत कोर्टानं आज हायकोर्टाच्या निर्णयाला स्थगिती दिली आहे.

2014 आणि 2019 च्या लोकसभा निवडणुकीत राणा उमेदवार होत्या. 2019 मध्ये शिवसेना नेते आनंदराव अडसूळ यांचा पराभव करीत त्या अपक्ष म्हणून निवडून आल्या. अडसूळ यांनी राणा यांच्या निवडणुकीला रिट याचिकेद्वारे 2018 मध्येच आव्हान दिले होते. राणा यांनी बनावट कागदपत्रांच्या आधारे ‘मोची’ असल्याचे दाखवून मुंबई उपनगर जिल्हाधिकार्‍यांकडून अनुसूचित जातीचा दाखला मिळवला आणि मुंबई उपनगर जिल्हा जात प्रमाणपत्र वैधता समितीने 3 नोव्हेंबर 2017 रोजी ते प्रमाणपत्र वैध ठरवले, असा अडसूळ यांचा आरोप होता.

You May Also Like