नवी दिल्ली – ऍलोपॅथी आणि ऍलोपॅथिक डॉक्‍टरांवर आक्षेपार्ह विधाने केल्याबद्दल इंडियन मेडिकल असोसिएशनने योगगुरू

नवी दिल्ली – ऍलोपॅथी आणि ऍलोपॅथिक डॉक्‍टरांवर आक्षेपार्ह विधाने केल्याबद्दल इंडियन मेडिकल असोसिएशनने योगगुरू आणि व्यावसायिक रामदेवबाबा यांच्यावर अब्रुनुकसानीचा दावा दाखल केला आहे. त्यांनी 15 दिवसांत माफी मागावी अथवा एक हजार कोटी रुपयांची नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी या नोटिसीत केली आहे.

तर दुसरीकडे सर्व स्तरातून मोठ्या प्रमाणात टीका होऊ लागल्यावर अखेर रामदेव बाबा यांनी आपलं वक्तव्य मागे घेतलं आहे. रामदेव बाबा यांच्या वक्तव्यावरून अनेकांनी त्यांच्यावर कडाडून टीका केली. याच मुद्यावरून बिहार भाजपाचे प्रदेशाध्यक्ष डॉक्टर संजय जायसवाल यांनी बाबा रामदेव यांच्यावर खोचक शब्दांमध्ये टीका केलीय.

ते म्हणाले,’आपण आपल्या घरात अनेक वर्षांपासून शिकंजी आणि ठंडाईचा वापर शितपेय वापर करत होतो मात्र आता आपण कोका कोला आणि पेप्सी वापरतो. याच प्रकारे भारतामध्ये हजारो वर्षांपासून योग अभ्यास करणारे लोक होऊन गेले. त्यांनी भारतीय संस्कृती आणि जीवनशैलीमध्ये मूलभूत बदल घडवून आणले. मात्र योग अभ्यासाला घरोघरी पोहचवण्यातील बाबा रामदेव यांचं योगदान नकारता येणार नाही. तसेच बाबा रामदेव एक चांगले योगगुरु आहे मात्र ते योगी नाहीयत. बाबा रामदेव यांना मी मस्करीत योग शास्त्राचे कोका कोला आहेत असं म्हणतो.’ असं म्हणत त्यांनी रामदेव बाबांवर खोचक टीका केली आहे.

दरम्यान, करोनाच्या काळात करोना विषाणूंपेक्षा अधिक जण आधुनिक वैद्यकीय उपचारामुळे मरण पावले, असे विधान रामदेवबाबा यांनी केले होते. त्यावर आपले विधान मागे घ्यावे, असे पत्र केंद्रीय आरोग्यमंत्री हर्ष वर्धन यांनी त्यांना पाठवले होते. त्यानंतर दोन दिवसांनी हे पाऊल उचलण्यात आले. रामदेवबाबा यांना पाठविलेल्या या नोटीशीने खळबळ उडाली आहे.

आयएमए (उत्तराखंड)च्या वतीने सचिव अजय खन्ना यांनी ही नोटीस बजावली. रामदेवबाबा यांच्या विधानाने असोसिएशनचे सदस्य असणाऱ्या दोन हजार डॉक्‍टरांच्या आणि ऍलोपॅथीच्या प्रतिमेचे हनन झाले आहे. बाबा रामदेव यांची ही कृती भारतीय दंडसंहितेच्या कलम 499 प्रमाणे गुन्हेगारी कृत्य आहे. त्यामुळे ही नोटीस मिळताच बाबा रामदेव यांनी लेखी माफी मागावी. हे न केल्यास प्रत्येक सदस्यांच्या 50 लाख मिळून नुकसानभरपाईचे एक हजार कोटी रुपयांचा नुकसानभरपाईचा दावा त्यांच्यावर दाखल करण्यात येईल, असे या नोटिसीत वकील नीरज पांडे यांनी नमूद केले आहे.

You May Also Like