नवी दिल्ली : करोनाच्या दुसऱ्या लाटेने देशात धुमाकूळ घातला आहे

नवी दिल्ली : करोनाच्या दुसऱ्या लाटेने देशात धुमाकूळ घातला आहे. देशात आढळून येणाऱ्या रुग्णसंख्येने रोज लाखांचा आकडा गाठला आहे. दरम्यान, सध्या उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्याही ३० लाखांच्या खाली आली आहे. पण, दररोज होत असलेल्या मृत्यूंच्या बाबतीत दिलासा काही मिळत नसल्याचे दिसत आहे. देशातील एकूण मृतांची संख्या तीन लाखांच्या जवळ पोहोचली आहे.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने गेल्या २४ तासांतील आकडेवारी जाहीर केली आहे. आरोग्य मंत्रालयानुसार देशात एका दिवसात दोन लाख ५७ हजार २९९ नवीन करोनबाधित रुग्ण आढळून आले आहेत. तर दिलासादायक बाब म्हणजे तीन लाख ५७ हजार ६३० रुग्णांनी करोनावर मात केली आहे.

गेल्या काही दिवसांपासून केंद्र आणि राज्य सरकारांच्या चिंतेत भर घालणाऱ्या मृतांच्या दैनंदिन संख्येत कोणतीही घट होताना दिसत नाही. गेल्या २४ तासांत देशात चार हजार १९४ मृत्यूंची नोंद झाली आहे. देशातील एकूण मृतांची संख्या दोन लाख ९५ हजार ५२५ वर पोहोचली आहे.

गेल्या २४ तासांत सर्वाधिक रुग्ण आढळून आलेल्या राज्यांच्या क्रमवारीत महाराष्ट्र चौथ्या स्थानी गेला आहे. तामिळनाडूत ३६ हजार १८४ रुग्ण आढळून आले. तर त्यापाठोपाठ कर्नाटक ३२ हजार २१८, केरळ २९ हजार ६७३, महाराष्ट्र २९ हजार ६४४ आणि आंध्र प्रदेश २० हजार ९३७ या पाच राज्यांचा समावेश आहे.

You May Also Like